Konkan Hapus Mango | कोकण हापूसचे अस्तित्व कायम राहणार

कोकणचा हापूस शतकानुशतके गुणवत्तेने, सुवासाने आणि चवीने बनलाय जागतिक ‘ब्रँड’
Konkan Hapus Mango
आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकमPudhari Photo
Published on
Updated on

प्रवीण शिंदे

दापोली : कोकणचा हापूस आंबा हा शतकानुशतके आपल्या गुणवत्तेने, सुवासाने आणि चवीने जागतिक ब्रँड बनला आहे. मात्र याच हापूसचे अस्तित्व आता नवीन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. कोकणच्या हापूसला मिळालेल्या भौगोलिक संकेत मानांकनाविरोधात गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून नव्याने आव्हान उभे राहिले असून, ‘वलसाड हापूस’ किंवा ‘वलसाडी हाफूस’ याची भौगोलिक संकेत नोंद व्हावी यासाठी होत असलेले प्रयत्न त्यामुळे कोकणात संतापाची लाट उसळली आहे.

2018 साली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना मिळालेल्या भौगोलिक संकेत मानांकनामुळे ‘कोकणचा हापूस’ ही ओळख अधिक मजबूत झाली आहे. तब्बल चारशेपाचशे वर्षांची परंपरा लाभलेला कोकणी हापूस हा देश,विदेशात वेगळ्या दर्जाने ओळखला जातो. मात्र वलसाड जिल्ह्यातून भौगोलिक संकेताची मागणी होताच कोकणच्या हापूस ब्रँडच्या विशिष्टतेवर ढग दाटण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

शेतकरी व उत्पादकांच्या मते, कोकणचा भौगोलिक संकेत काढून घेतला जात आहे असे नसले तरी वलसाडचा भौगोलिक संकेत मंजूर झाल्यास बाजारपेठेत दोन वेगवेगळ्या ‘हापूस’ ब्रँडची निर्मिती होणार आहे. यातून ग्राहकांत गोंधळ वाढेल, दरांत अस्थिरता येईल आणि निर्यात बाजारावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या वलसाडचा अर्ज भौगोलिक संकेत रजिस्ट्रार कार्यालयात प्रक्रियेत असून आक्षेप नोंदवण्याची मुदत सुरू आहे. त्यामुळे हा विषय पुढील काही दिवसांत आणखी गती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नागपूर अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारने कोकणच्या हापूसच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. याला आमदार शेखर निकम यांनीदेखील दुजोरा देत अधिवेशनात लक्ष वेधून घेतले. हे दोन्ही आमदार दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये आहेत.

कोकणातील समुद्रकिनारी असणारी खारी हवा व हवामानाची अनुकूलता हापूस आंब्याच्या दर्जाला मोठी पोषक ठरते. इंग्रजांच्या काळातही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड या पट्ट्यातील जमिनीत हापूस सर्वोत्तम ठरल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कोकणात हापूस हंगामातच येतो; तर वलसाड हापूस हा मुख्य हंगाम संपल्यानंतर तयार होतो. त्यामुळे कोकणच्या हापूसची तुलना वलसाड हापूसशी करणे योग्य नाही.
सचिन तोडणकर सरपंच, कर्दे-दापोली

दरम्यान, कोकणचा हापूस हा फक्त एक आंब्याचा प्रकार नाही; तर कोकणच्या हवामानाचा, मातीचा, परंपरेचा आणि मेहनती शेतकर्‍यांच्या घामाचा वारसा आहे. त्याच्या अस्मितेवर कुठलेही संकट येऊ नये, अशी भूमिका आता संपूर्ण कोकणातून ठामपणे मांडली जात आहे.

Konkan Hapus Mango
Ratnagiri Administration Action | जिल्हा परिषदेतील 266 अधिकारी कर्मचार्‍यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news