

रत्नागिरी ः देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस विभागाकडून ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
कोकणात एकूण 525 लँडिंग पॉईंट आहेत. त्या ठिकाणची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, पोलिस दलाकडून सागरी किनारी गस्त वाढवण्यात आली आहे. अतिदक्षतेचा इशाला म्हणून जिल्ह्यातील महत्त्वाची बंदरे, पर्यटनस्थळे, पूल या ठिकाणी पोलिस दलाकडून बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी तपासणी प्रशिक्षित पथकामार्फत सुरू करण्यात आली आहे. तसेच, विविध ठिकाणी पोलिस कोस्टगार्ड आणि कस्टम संयुक्तपणे गस्त घालत आहेत. जिल्हा पोलिस विभागाकडून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, सोमवारी सकाळी पोलिसांकडून मिरकरवाडा जेटी, भाट्ये समुद्र आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग करून मच्छीमारी नौका आणि वाहनांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनीही कोणतीही संशयित हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यास कळवावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
कोकणातील किनारी भागात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असल्याची माहिती कोकण परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली. 1993 मध्ये रायगडच्या सागरी किनारपट्टीतील श्रीवर्धन मधील शेखाडी येथे बेकायदेशीररित्या आरडीएक्स या अतिसंहारक स्फोटकांची तस्करी झाली होती. त्यानंतर मुंबई शहरात 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या सागरी किनारपट्टीत देखील सोमवारी रात्री पासूनच पोलिसांनी सतर्क होवून नाकाबंदी करुन सर्वत्र तपासणी सूरु करण्यात आली.