कोकण कृषी विद्यापीठाला 112 कोटींचा महाअन्नपूर्णा प्रकल्प मंजूर pudhari photo
रायगड

Konkan Krishi Vidyapeeth funding : कोकण कृषी विद्यापीठाला 112 कोटींचा महाअन्नपूर्णा प्रकल्प मंजूर

दापोली कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाइन्स यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील भात शेतीचे चित्र बदलणारा महाअन्नपूर्णा प्रकल्प 1.0 मंजूर झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाअन्नपूर्णा प्रकल्पाचे स्वरूप आणि अंमलबजावणी : महाअन्नपूर्णा प्रकल्प प्रकल्प पुढील 5 वर्षांसाठी असून यामध्ये 60 टक्के वाटा केंद्र शासनाचा आणि 40 टक्के वाटा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 14 संशोधन केंद्रांवर तसेच भात उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर केली जाईल.

कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार करण्यात आला असून, कर्जतचे भात विशेषज्ञ डॉ. बी.डी. वाघमोडे हे या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आहेत. बदलत्या हवामानावर मात करण्याचे उद्दिष्ट : राज्यातील भात शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. हवामान बदलामुळे पावसाचा खंड, अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि मजुरांची टंचाई अशा समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. या आव्हानांना समर्थपणे पेलण्यासाठी महाअन्नपूर्णा 1.0 अंतर्गत विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

कमी ओलावा, क्षारता आणि पूरसदृश्य परिस्थितीत तग धरणाऱ्या भात जाती विकसित करणे, पेर भातासाठी (डायरेक्ट सिडींग) अनुकूल आणि ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन वाणांची निर्मिती करणे,डिजिटल तंत्रज्ञान, जनुकीय निवड आणि अचूक निरीक्षण पद्धतीचा वापर करून उत्पादन वाढवणे ही प्रमुख उद्दीष्टे आहेत.

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रशिक्षण : महाअन्नपूर्णा प्रकल्पात आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (आयआरआऱआय), फिलिपाइन्स हे धोरणात्मक सहकारी म्हणून काम पाहणार आहेत. याद्वारे राज्यातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांकडून उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.

यामुळे राज्यातील बियाणे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सक्षम होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अर्थ विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि कृषी विभागाचे मुख्य सचिव परिमल सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT