kolhapur | ‘पंचसूत्री’तून वस्त्रोद्योगातील उत्पादन, निर्यातीला मिळणार गती

kolhapur | ‘पंचसूत्री’तून वस्त्रोद्योगातील उत्पादन, निर्यातीला मिळणार गती

Published on

बाबासो राजमाने

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी पाच कलमी सर्वसमावेशक अशी वस्त्रोद्योग योजना जाहीर केली. कापड उत्पादन, जागतिक बाजारात कापडाचे ब—ँडिंग आणि नव्याने बाजारपेठ विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. वाढीव मेगा टेक्स्टाईल पार्कच्या घोषणा, तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काही शटललेस लूम्सवरील आयात शुल्कात दिलेली सूट आणि मोठ्या उद्योगांसह लघुउद्योगांनाही सकारात्मक अशा आणलेल्या योजना यामुळे वस्त्रोद्योगाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील वस्त्रोद्योगाच्या धोरणांकडे इचलकरंजीसह संपूर्ण वस्त्रोद्योग केंद्राचे लक्ष लागून राहिले होते. भरीव तरतुदींमुळे वस्त्रोद्योगला नवीन दिशा मिळणार असून रोजगारनिर्मिती, निर्यात वाढ आणि मेक इन इंडियाला आणखी बळ प्राप्त होणार आहे. या अर्थसंकल्पात ‘फाईव्ह एफ’ फार्म टू फॉरेन अर्थात कापूस उत्पादक शेतकर्‍यांपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापड निर्यातीपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी सक्षम करण्याविषयी विविध धोरणे या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे शेतकरी, सूतगिरण्या आणि कापड उत्पादक त्याचबरोबर कापड निर्यातदार यांना थेट लाभ होणार आहे.

यापूर्वी 12 मेगा टेक्स्टाईल पार्क जाहीर केले असून आताच्या अर्थसंकल्पात चॅलेंज मोड अंतर्गत नवीन मेगा टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आहे. या पार्कमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मिती होणार आहे. हातमाग, खादी, ग्रामोद्योग, हस्तकला यांना विशेष प्रोत्साहन देणार्‍या तरतुदी या अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केल्या आहेत. रोजगार वाढीला चालना मिळण्यासाठी ‘समर्थ 2.0’ योजनेतून कौशल्याला प्राधान्य देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने उद्योगांना कुशल असे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योगासाठी वापरल्या जाणार्‍या अत्याधुनिक यंत्रमाग व सामग्री यावरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 10 हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे. पायाभूत सुविधा विकास तंत्रज्ञान अद्ययावत करणे आणि निर्यातीसह रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी पाच कलमी जाहीर केलेली योजना वस्त्रोद्योगातील विविध घटकांना बळ देणार आहे. राष्ट्रीय फायबर योजना, मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार, राष्ट्रीय हातमाग व हस्तकला कर्यक्रम, टेक्स इको इनिशिएटिव्ह आदींसह विविध विशेष प्रोत्साहन योजना उत्पादन क्षमता वाढीसह निर्यातीला चालना देणार्‍या ठरतील.

योजना प्रत्यक्षात पोहोचणार का?

केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील वस्त्रोद्योगाला आधुनिकीकरण आणि जागतिक स्पर्धेत पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीची घोषणा झाली असली तरी त्यातील स्पष्टता झालेली नाही. निर्यातीला प्रोत्साहन, रोजगार वाढ यासह अन्य घटकांना लाभ देणारा हा अर्थसंकल्प आहे. मात्र अनेक मागण्या अद्यापही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. त्यांची तड लागलेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना प्रत्यक्षात पोहोचणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news