Kolad Mahad Khamb Rain Update
श्याम लोखंडे/ विश्वास निकम
खांब/कोलाड/महाड: सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा एकदा कुंडलिका व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग बंद करण्यात आला असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील माणगाव येथील कलमजे जवळील पुलावरून वाहणारे पाणी आणि पुलाची अवस्था या पार्श्वभूमीवर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर महाडमधील 10 दरडग्रस्त गावातील 78 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
महिसदरा नदीचे पाणी गोवे येथील आदिवासीवाडी, बौद्धवाडी तसेच रस्त्यावर असणाऱ्या दुकानात तसेच गावातील काही घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले.
काही दिवसांपूर्वी भात लावणी करण्यात आली होती. यानंतर भात लावणी केल्यानंतर लागवड केलेल्या भात शेतीवर करपा रोग आला. यानंतर सतत तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीत पाणी शिरल्यामुळे भातशेतीचे ही नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्यामुळे कामावर जाणारे कामगार तसेच इतर नागरिकांची ही तारांबळ उडाली असून शाळा- महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
रोहा- नागोठणे मार्गावर झाड कोसळले
रोहा नागोठणे मार्गांवर भिसे खिंडीत एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याची माहिती SVRSS टीमला मिळताच ही टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली. झाडाचे तुकडे करून मार्ग मोकळा करण्यात आला.
माणगावजवळ मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक वळवली
मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी माणगावजवळील पुलावरून पाणी वाहू लागले. तसेच पुलाची अवस्था पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई- गोवा महामार्गावरील माणगाव महाडकडे जाणारी वाहतूक कोलाड- आंबेवाडी नाका येथील भिरा फाट्यावरून वळविण्यात आली.
साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात भर पावसात रास्ता रोको
साळाव–तळेखार महामार्गाची दुरावस्थेवरून मंगळवारी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सहा महिन्यांपासून उखडून ठेवलेल्या १३ किमी रस्त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व बेजबाबदारामुळे ही अवस्था झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, मा. जिल्हापरिषद सदस्य राजेश्री मिसाळ, मुरूड तालुकाप्रमुख नवशाद दळवी, युवासेना तालुकाप्रमुख किशोर काजारे, चणेरा विभाग प्रमुख मनोज तांडेल, चोरडे सरपंच तृप्ती घाग, साळाव सरपंच वैभव कांबळे, मिठेखार सरपंच अशोक वाघमारे, नागाव मा.सरपंच नंदकुमार मयेकर, विशाल तांबडे, रमेश गायकर, सनी ठाकूर शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तब्बल २०० ते २५० नागरिकांनी भर पावसात रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन छेडले.
महाड तालुक्यातील 10 दरडग्रस्त गावातील 78 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
महाड तालुक्यातील भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या एकूण 72 दरडग्रस्त गावांपैकी वर्ग एक व दोन मधील 78 ग्रामस्थांना सोमवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली.
तालुक्यातील वर्ग एक मधील नामोले कोंड लोअर तुडील, मोरेवाडी सिंगर कोंड , पाथेरी वाडी आंबिवली व कोंडीवते मूळ गावठाण, तसेच वर्ग दोन अंतर्गत येणाऱ्या मुठवली, सोनघर ,चांडवे खुर्द, सव , रोहन कोथेरी जंगमवाडी, म्हस्के कोंड व नातोंडी येथील एकूण 78 जणांना सोमवारी सायंकाळी सुरक्षितेच्या कारणास्तव हलविण्यात आले होते.
महाड स्थानिक प्रशासनाकडून तालुक्यातील अशा दरडग्रस्त गावातील नागरिकांना सायंकाळ नंतर सुरक्षित स्थळी जाण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
या गावातील शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी 78 जणांनी रात्री निवास केल्याची माहिती महाड तहसील प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली.