

Raigad river flooding 500 evacuated
जयंत धुळप
रायगड : रायगड जिल्ह्यात आज (दि. १९) पाचव्या दिवशी जोरदार पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत माथेरान येथे सर्वाधीक २५४ मिमी पावसांची नोंद झाली आहे. पूरजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात एकूण ५०० नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे ७४ घरे व सरकारी मालमत्ताचे मोठे नुकसान झाले आहे.
आंबा आणि कुंडलिका नद्यांची पाणी पातळी धोकादायक पातळीच्यावर असल्याने दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यांवरील गावांत अलर्ट देण्यात आला आहे. लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आल्यास त्यासाठीची सज्जता स्थानिक आपत्ती निवारण यंत्रणांनी ठेवली आहे.
रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक २५४ मिमी पावसांची नोंद माथेरान येथे झाली आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये अलिबाग १९०, मुरुड ९३, पेण- १९०, पनवेल- २०७, उरण- १३९, कर्जत- १७५, खालापूर- १३२, म्हसळा-२५१, रोहा- २२३, सुधागड- १७६, माणगाव- २१७, तळा- २४१, महाड-१५७, पोलादपूर- १६१, श्रीवर्धन- २०८, म्हसळा- २५१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १८८.४६ मिमी आहे.
दरम्यान, आज तातडीने स्थलांतर केलेल्या ५०० नागरिकांमध्ये पनवेल येथील 154 , माणगाव येथे 138, रोहा 92, तळा 11, पोलादपूर येथील 105 नागरिकांचा समावेश आहे.