

मुंबई : मुंबई उपनगरांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे नॅशनल पार्कमधील तुळशी तलावानंतर आता विहार तलावही सोमवारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्या सातही तलावांतील पाणीसाठा 91.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरासह तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तलावांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी नॅशनल पार्कमधील तुळशी तलाव वाहू लागल्यानंतर सोमवारी विहार तलावही वाहू लागला. त्यामुळे आतापर्यंत 7 पैकी 6 तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
भातसा तलाव मात्र अद्यापपर्यंत भरलेला नाही. मुंबईत पावसाने दांडी मारल्यामुळे विहार तलाव भरण्यास उशीर झाला होता. हा तलाव गेल्यावर्षी 25 जुलैला मध्यरात्री 3.50 वाजता ओसंडून वाहू लागला होता. 2023 मध्ये 26 जुलै रात्री 12.48 वाजता, तर 2022 मध्ये 11 ऑगस्ट आणि 2021 मध्ये 18 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2,769.8 कोटी लिटर (27,698 दशलक्ष लिटर) एवढी आहे.
13 लाख दशलक्ष लिटर साठा
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांमध्ये सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 13 लाख 19 हजार 640 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा एकूण पाणीसाठ्याच्या 91.18 टक्के इतका आहे. सातही तलावांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर्स इतकी पाणी साठवण्याची क्षमता आहे.
तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अपर वैतरणा - 1,97,833
मोडकसागर - 1,11,656
तानसा - 1,43,357
मध्य वैतरणा - 1,88,376
भातसा - 6,44,015
विहार - 27,698
तुळशी - 8,046