खांब : श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे परिसरातील परतीच्या पावसाने खरिपाच्या हंगामाची भातशेती झोडपली तर अखेर हातातोंडाशी आलेला सोन्याचा घास हिरावला गेला असल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून तो चिंतातुर झाला आहे.तर बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री जोरदार पाऊस पडल्याने भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर काहींनी कापणी केलेल्या भातशेतीत मोठया प्रमाणात पाणी साचून राहिल्याने भातशेतीचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार समजला जाणाऱ्या या जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे परिसरात हस्त नक्षत्र दोन चार दिवसांवर तसेच ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर धान पिकांच्या नुकसानीचे संकट उभे राहिले आहे. मागील दोन दिवसांपासून तुफान परतीचा पाऊस होत आहे. यामुळे या परिसरातील भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या परिसरातील पिकाला आलेल्या मोत्याची कणस तसेच हातातोंडाशी आलेला घास हिरावूनच गेला म्हणावं लागेल हेच कायम बळीराजाच्या नशिबी कारण यावेळी बळीराजावर धान पेरणी आधी पासूनच अस्मानी संकट ओढवली.
मागील मे महिन्यात दुबार पीक घेणाऱ्या तिसे, शिरवली, मुठवली, पुगाव, पूई, गोवे, या शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान झाले त्याचे पंचनामे तत्काळ प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषिधिकारी तसेच अधिकारी वर्गाने जागेवर पाहणी करून केले. मात्र ते अद्याप वाऱ्यावरच असताना कापणीला आलेली पिकांचे पुन्हा जोरदार परतीचा पाऊस बरसल्याने मोठे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.
यामुळे शासनाकडून या भातशेतीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून त्याचा मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तसेच राज्य सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून मुख्यमंत्री महोदय यांचे कडे मागणी केली जात आहे .
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी वेळोवेळी पाऊस बरसला अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण केली त्यामुळे विविध ठिकाणी विविध पिकांची खूप प्रमाणावर नुकसानी झाली त्यातून देखील बळीराजाने मोठे शर्थीचे प्रयत्न करत भात पेरणी वेळेवर झाली.
दिवसेंदिवस बळीराजा चिंतेत येत असताना दिसत आहे. शेतीसाठी आवश्यक बीबियाणे, रासायनिक खते, नांगरणी, मजुरीचे दर वाढत चालले आहेत. परिणाम कोणताही असो तरी ही शेतकरी वर्ग मोठया कष्टाने भातशेतीत भात लागवड तसेच अधिक जोड व्यवसाय करीत असतो. यावेळी भातपिक चांगले येऊन ही परतीच्या पावसाने भातशेती जमीनदोस्त झाल्याने येथील शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या प्रवासात निसर्गाने हिरावून नेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून त्यांना देण्याची घोषणा करावी, अशी मागणी आहे.वसंतराव मरवडे, माजी सरपंच