Khopoli Resort Theft Case Pudhari
रायगड

Khopoli Resort Theft Case: खोपोलीत रिसॉर्टमधील लॉकर फोडून 18.76 लाखांचे दागिने चोरी; तिघे आरोपी अटकेत

खालापूर पोलिसांची जलद कारवाई; कर्जतमधील तिघांकडून सर्व दागिने व रोख रक्कम जप्त

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : खालापूर तालुक्यांतील चौक कर्जत मार्गावरील खैराट गावा जवळील सॉल्ट रिसोर्ट ॲन्ड ओलियंडर फार्म येथे गेल्या 25 फेब्रुवारी रोजी आलेल्या ग्राहकाचे 18 लाख 70 रुपये किंमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने व 6 हजार 500 रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या मयूर किसन आगिवले (24, रा. कोतवालनगर, कर्जत) ,प्रविण कृष्णा सगणे(25, रा. नानामास्तर नगर ,कर्जत) आणि ओमकार दत्ता सरोदे (25, रा. नानामास्तर नगर, कर्जत) या तिघांना अटक करुन, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने व रोकड परत मिळवण्यात खालापूर पोलिसांना यश आले आहे.

25 फेब्रुवारी रोजी पवन गजानन अग्रवाल हे हैदराबाद येथील फर्निचर व्यावसायिक त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांच्या विवाह सोहळयाकरीता या रिसॉर्टमध्ये मुक्कामी आले होते. त्यांना त्यांच्या किंमती वस्तू दागिणे व रोख रक्कम ठेवण्यासाठी लॉकर देण्यात आला होता. त्या लॉकरमध्ये त्यांनी त्याचे हे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम ठेवून हळदी समारंभाकरीता ते गेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी बंद रूमचा दरवाजा उघडून रूममध्ये प्रवेश करून मास्टर पासवर्डने लॉकर उघडून लॉकरमधील 18लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिणे व 6 हजार 500 रुपयांची रोकडे चोरून नेली असता खालापूर पोलीस ठाण्यात या अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खालापूर पोलिसांनी जलद गतीने तपास करत कर्जत शहरामधील या तीनही चोरट्यांना गजाआड केले आहे.

27 फेब्रुवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर कोणताही पुरावा नसताना खालापूर पोलिसांनी गुन्हयाचा तांत्रिक तपास करून रिसोर्ट ॲन्ड हॉटेलमधील मयूर किसन आगिवले ,प्रविण कृष्णा सगणे ,ओमकार दत्ता सरोदे आणि दोन सिक्युरिटी गार्ड, रूमबॉय यांना संशयीत म्हणून ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी सुरु केली.त्यानी गुन्हा केल्याचे कबूली दिली. मयूर किसन आगिवले यास 03 मार्च रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता,त्यास पोलीस कोठडी देण्यात आली. या दरम्यान त्याच्याकडून चोरीस

गेलेले सर्व दागीने व रोख रक्कम असा एकूण 18 लाख 76 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल यांच्याकडून परत मिळवण्यात पोलीसांना यश आले. खालापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मोहन भालेराव, पोलीस शेखर मोरे, देवेंद्र शिणगारे, संतोष जाधव, रूपेश खोत या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

कोणताही मालमत्तेचा गुन्हा घडल्यास व त्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास तसेच कोणीही संशयीत व्यक्ती, वाहन फिरताना आढल्यास ती माहिती डायल 112, रायगड दृष्टी व्हॉटसप अँप, 7620032931, जनसपंर्क अधिकारी, रायगड अलिबाग, नियंत्रण कक्ष रायगड अलिबाग येथे तसेच खालापूर पोलीस ठाणेत कॉल करून किंवा समक्ष भेटून माहिती देण्यात यावी. ज्या योगे गुन्हा घडल्यास त्यांची सत्वर उकल करण्यास मदत होईल.
सचिन पवार, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT