खोपोली : खोपोली शहरातील मोगलवाडी डीपी रस्त्यालगत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या ड्रेनेज टँकचे झाकण तुटल्याने एका गाभण गायीचा टँकमध्ये पडून अपघात झाला. टँकमध्ये सुमारे सात ते आठ फूट पाणी साचलेले असल्याने गायीला हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती. घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडची टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन गायीची सुखरूप सुटका केली.
गायीच्या मालकांकडून ती गाय गाभण असल्याची माहिती मिळाल्याने बचावकार्य अधिक काळजीपूर्वक राबविण्यात आले. प्रथम सक्शन पंपाच्या सहाय्याने टँकमधील काही प्रमाणात पाणी उपसण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्रणा आणि मानवी साखळीच्या मदतीने टँकची भिंत नियंत्रित पद्धतीने फोडण्यात आली. तर जवळपास दोन तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गायीला कोणतीही गंभीर इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि समन्वयपूर्ण बचावकार्यासाठी खोपोली नगरपालिकेचे परिवहन सभापती किशोर पाटील यांनी दोन्ही पथकांचे कौतुक केले. तसेच गायीच्या तपासणी व उपचारासाठी पशुवैद्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले.