खोपोली ः कर्जत, खालापूर, खोपोलीमध्ये सध्या शिंदे शिवसेनेचे आ.महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यात राजकीय खून्नस आहे. त्यातून राजकीय वादाचे पर्यवसान खोपोलीत शिवसेना नेते मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडात झाल्याची जोरदार चर्चा खोपोलीमध्ये होत आहे.अशाप्रकारे राजकीय वैमनस्यातून हत्या होण्याची ही खोपोलीमधील पहिलीच घटनाअसल्याने सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
राजकीय खून्नस वाढली खोपोलीतील शुक्रवारी घडलेली घटना ही राजकीय वर्चस्वातूनच घडल्याने शहरातील वातावरण कमालीचे तंग बनलेले आहे. खोपोली नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादीतर्फे रवींद्र देवकर यांची पत्नी उज्वला देवकर विरुद्ध शिंदे शिवसेनेचे मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे अशी तुल्यबळ लढत झाली.यामध्ये मानसी काळोखे या विजयी झाल्या.यापूर्वी सन 2016 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही या दोघी परस्परांच्या विरोधातउभ्या ठाकल्या होत्या.
त्यावेळीही उज्वला देवकर यांना पराभव स्वीकारावा लागला.यावेळी तसाच पराभव झाल्याने देवकर विरुद्ध काळोखे परिवारातील खून्नस वाढीला लागली.काळोखे यांचा राजकीय प्रवास भाजप ते शिवसेना असा झालेला आहे.
दरम्यान,मंगेळ काळोखे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकानी इन्कार केला आहे.जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यातघेतला जाणार नाही,प्रसंगी तो मृतदेह पोलीस ठाण्यात आणू असा इशाराही नातेवाईकांसह शिवसेनेने दिला आहे.रात्री उशिरापर्यंत खोपोली पोलीस ठाण्यात मोठा जमाव ठाण मांडून होता.
चार दिवसांपासून घराची रेकी
गेल्या चार दिवसांपासून देवकर परिवाराकडून काळोखे यांच्याघराची,त्यांच्या येण्याजाण्याची रेकी करण्यात आली,अशी तक्रार काळोखे कुटुंबियांकडून खोपोली पोलिसांकडे देण्यात आली.मात्र,त्याकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले नाही,असा आरोप काळोखे परिवाराने केलेला आहे.
मंत्री गोगावलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप
या हत्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. या हत्यामागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. खोपोली मधील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याच्या कारणामुळेच ही हत्या झाली असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. निवडणुकीचा निकाल लागताच ही हत्या झाली. ही दुर्दैवी बाब असून हा सगळा खेळ राष्ट्रवादीनेच केला असावा, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडावं, अशी मागणीही गोगावले यांनी केली आहे.