प्रशांत गोपाळे
खोपोली: कर्जाच्या वसुलीसाठी दिलेल्या धमक्या एका कुटुंबाच्या आयुष्यावरच घाला घालणाऱ्या ठरल्या का? सावकारीच्या पैशांसाठी घरात घुसून लाथाबुक्क्यांनी दरवाजा ठोठावणे, अश्लील शिवीगाळ आणि धमकावल्याच्या आरोपांनंतर एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपविल्याची मन सुन्न करणारी घटना खालापूर तालुक्यातील भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटीमध्ये घडली.
मानसी मच्छिंद्र पोपटे (३३), मुलगा रुद्र (११) आणि मुलगी अन्सिका (८) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेला सावकारीच्या पैशांचा वाद कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, संशयित देसाई दाम्पत्य फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मच्छिंद्र पोपटे हे पत्नी मानसी आणि दोन मुलांसह हिरानंदानी फॉर्च्युन सिटीमध्ये राहत होते. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांनी निगडी, पुणे येथील विश्वनाथ देसाई यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
मात्र, पैसे परत मिळत नसल्याने विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी अक्षरा देसाई हे पोपटे यांच्या घरी आले. त्यावेळी मच्छिंद्र पोपटे घरी नव्हते. त्यामुळे देसाई दाम्पत्याने घराच्या दरवाजावर लाथा मारून तो उघडण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
दरवाजा उघडल्यानंतर दोघांनी घरात प्रवेश करून मानसी पोपटे यांना धमकावले व अश्लील शिवीगाळ केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर मानसी पोपटे यांनी रुद्र आणि अन्सिका या दोन्ही मुलांसह इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेतली.
पैशांच्या वादातून ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संशयित विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी अक्षरा देसाई हे दोघेही फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे-डॉ. विशाल नेहूल पाटील, खालापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी