खारघर: खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2025-2026 या कालावधीत झालेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात खारघर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी विविध राज्यांतून तांत्रिक तपास व अथक पाठपुरावा करून तब्बल 94 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आज हा सर्व मुद्देमाल अधिकृतपणे त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
खारघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, एका प्रतिष्ठित व्यक्तीला चाकूने वार करून जखमी करत 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून एकूण 7 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले संपूर्ण 57 लाख रुपये किमतीचे 57 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दुसऱ्या एका घटनेत, खारघर येथील एका महिलेच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातून 27 लाख रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली होती. खारघर पोलिसांनी या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण 27 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
हद्दीत गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी सीईआयआर पोर्ट या तांत्रिक यंत्रणेचा प्रभावी वापर केला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि झारखंड या राज्यांमध्ये थेट जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने 10 लाख 74 हजार रुपये किमतीचे एकूण 50 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
मोबाईल हस्तगत करण्यासाठी पोलीस शिपाई मोतीराम आगिवले यांनी विशेष कामगिरी बजावली. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमधून खारघर पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
वेळोवेळी घडणाऱ्या चोरीच्या घटनाचा पोलिसांकडू तातडीने तपास होत आहे. त्यामुळे चोरी झालेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश येत आहे. हा हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत केला जात असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
आंतरराज्यीय पातळीवर केला तपास
खारघर पोलिसांनी उत्कृष्ट तांत्रिक तपास आणि आंतरराज्यीय पातळीवर पाठपुरावा करून एकूण 94 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा केला. हा सर्व मुद्देमाल आज खारघर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात सन्मानाने मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. आपला हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
ही धडक कारवाई खारघर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस निरीक्षक अशोक डमाळे, सुरज पाटील, शितल पाटील, सपोनि शरद बरकडे, पोउपनि सुरज जाधव आणि त्यांच्या अंमलदार पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.