Kharghar News Pudhari
रायगड

Kharghar News: खारघरमध्ये हुक्क्याचा बाजार उद्ध्वस्त; ९२ हजार रुपयांचे हुक्का पॉट, प्रतिबंधित फ्लेवर्स जप्त,२२ वर्षीय तरुणावर गुन्हा

कॉलेजच्या अगदी जवळ सुरू होता हुक्का साहित्याचा अड्डा! खारघरमध्ये पोलिसांचा छापा; २२ वर्षीय दुकानचालक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नवीन पनवेल: शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही, खारघरमधील एका नामांकित कॉलेजच्या अगदी जवळ बेकायदेशीरपणे हुक्का पार्लरचे साहित्य आणि प्रतिबंधित फ्लेवर्स विकणाऱ्या अड्ड्यावर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी कक्षाने धडक कारवाई केली.

या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असून एका २२ वर्षीय दुकान चालकाला ताब्यात घेतले आहे.

खारघर सेक्टर ४ मधील 'द स्मोक शॉप' नावाच्या दुकानातून आयटीएम कॉलेज या शैक्षणिक संस्थेच्या अवघ्या ५० मी. परिसराच्या आत हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य आणि वेगवेगळ्या घातक फ्लेवर्सची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती.

शाळा-कॉलेजच्या १०० मी. परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्याने मनाई असल्याने पोलिसांनी या माहितीची शहानिशा करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने खारघर येथील द स्मोक शॉपवर अचानक छापा टाकला.

यावेळी दुकानात काही ग्राहक हुक्का साहित्य व फ्लेवर्सची खरेदी करताना आढळले. यावेळी दुकानातून शासनाने प्रतिबंधित केलेले आणि तरुणाईला व्यसनाच्या आहारी ढकलणारे विविध नामांकित कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्सचे डबे जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT