

प्रकाश साबळे
मुंबई: कांदिवली पुर्वकडील ३६.३० मीटर लोखंडवाला संकुल ते मालाड जलाशय टेकडी विकास नियोजीत रस्ता रूंदीकरणातील गोकूळ नगरातील बाधित झोपडीधारकांना महापालिकेकडून २२५ फूटांची घरे माथी मारण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तशा नोटीसा झोपडीधारकांना पालिका पी.पुर्व विभागाकडून देण्यात आल्या आहेत. ३०५ फूटांच्या घराचा जीआर असतांना २२५ फूट घरे देण्यामागचे कारण काय? असा सवाल झोपडीधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर गोकूळ नगरातील १४० झोपडपट्टीधारकांना पालिकेने घरे निष्कासित करण्याच्या नोटीसा पाठविल्याने झोपडीधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गोकूळ नगर येथील बाधित झोपडीधारकांना लोखंडवाला संकुल ते मालाड टेकडी जलाशय विकास नियोजित रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याने घरे निष्कासित करण्याच्या नोटीसा आल्या आहेत.
या नोटीसांमध्ये झोपडीधारकांचे पर्यायी पुनर्वसन कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमधील महादेव अपार्टमेंट येथील उपलब्ध सदनिकांमध्ये करण्यात येणार आहे. सदर सदनिका या २२५ फूटांच्या असल्याने या घरांमध्ये दोन कुटुंब कशी राहतील, असा प्रश्न बाधितांना पडला आहे. याविरोधात स्थानिक नगरसेविका पुष्पा निळंबे यांनी आवाज उठविला असून, याप्रकरणी पालिका आयुक्तांची भेट घेवून सदर सदनिका वाटप न करण्याचे सागणार आहेत.
‘महादेव’मधील घरे सिंग इस्टेटमधील बाधितांनी नाकारली होती
येथील महादेव अपार्टमेंटमधील २२५ फूटांची घरे १२० फूट डिपी रोडमधील बाधित सिंग इस्टेटमधील रहिवाशांनी सन २०२५ मध्ये नाकारलेली होती. मात्र आता पी.पुर्व विभागाने गोकून नगरातील बाधित झोपडीधारकांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
३०५ फुटांची घरे द्या, अन्यथा आंदोलन
गोकूळ नगर येथील झोपडपट्टीत सर्वसामान्य रहिवासी वास्तव्याला आहेत. एका घरात दोन ते तीन कुटुंब राहते. अशावेळी त्यांची घरे विकास नियोजित रस्त्यासाठी निष्कासित करून, त्यांना २२५ फूटांचे घरे देणे योग्य नाही.
यामुळे पालिकेने लगतच्या एसआरए योजनेतील ३०५ फूटांची घरे द्यावीत. अन्यथा झोपडीधारकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उबाठा गटाच्या स्थानिक नगरसेविका पुष्पा कळंबे यांनी दिला आहे.