Panvel crime news
पनवेल : विक्रम बाबर
खांदा कॉलनीतील शिवछत्र रो हाउस येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल राजराम पराते (वय ६७) हे खांदा कॉलनीतील सेक्टर ७ मधील शिवछत्र रो हाउस येथे राहतात. त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२५ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, लहान मंगळसूत्रे, पुरुषांची सोन्याची अंगठी, महिलांच्या अंगठ्या, कानातील दागिने तसेच गळ्यातील पेंडल असलेली सोन्याची चेन असा सोन्याचा ऐवज लंपास केला. याशिवाय देवाचे चित्र असलेली चांदीची नाणी, चांदीची पैंजणे, चांदीचा पेला आणि १ हजार ५०० रुपये रोख रक्कमही चोरून नेण्यात आली.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, प्रत्येकी १० ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे, सात ग्रॅम वजनाची पुरुषांची अंगठी, तीन ग्रॅम वजनाच्या चार महिलांच्या अंगठ्या, तीन ग्रॅम वजनाच्या कानातील दोन बेऱ्या तसेच १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पनवेल विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मयुर भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम घेगडमल आणि सहायक पोलिस निरीक्षक विनोद परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५० वाजता पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद परदेशी करीत आहेत. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.