खोपोली: अवघ्या दरवर्षी प्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरू होणार या आशेने खालापूर तालुक्यातील शेतकरी भात पेरणीच्या तयारीला लागले होते. शेतांची मशागत, बियाण्यांची खरेदी अंतिम टप्प्यात असताना यंदाही बदलत्या पावसाच्या स्वरूपाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
एकेकाळी नियमित आणि सातत्यपूर्ण पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यात आता काही दिवस मुसळधार पाऊस आणि त्यानंतर दीर्घ खंड अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतीचे संपूर्ण गणित बदलले असल्याने पेरणी लांबणीवर गेल्याने बळीराजा संकटात सापडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या खालापूर तालुक्यात काही शेतकरी वर्गाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. विशेषतः भात हे येथील प्रमुख पीक असून त्याची संपूर्ण शेती मान्सूनवर आधारित आहे. पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होताच शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करत असत.
जुलै ते सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सातत्यपूर्ण पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळत असे. मात्र गेल्या या वर्षात पावसाचा स्वभाव बदलल्याने शेतकऱ्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.
तर जून महिना मध्यावर आला असता पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी राजा देवाकडे साकडे घालत लवकरात लवकर पाऊस पडावा व आम्हाला शेतीची कामे करत आमचे उन्हाळ्यात ओसाड पडलेले माळरान पुन्हा नव्याने हिरवेगार व्हावेत अशी प्रार्थना करत असून पावसाने अशीच दांडी कायम ठेवल्यास खालापुर तालुक्यात भात शेती व्यवसाय मोठ्या संकटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची किती शेतकरी राजा व्यक्त करत आहे.
जलसंधारण हाच पर्याय बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाणी जिरवा, पाणी आडवा या संकल्पनेचे महत्व अधिक वाढले असून प्रत्येक माणसाने स्थानिक पातळीवर पावसाचे पाणी अडवण्यावर भर दिला तर भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होऊ शकते.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळ पाऊस मे महिन्यात पडत असल्याने याचा परिणाम होत असून याचे प्रमुख कारण मानवनिर्मित वृक्षतोडीही बनली आहे. त्यामुळे भविष्यात असे संकट ओढाऊ नये म्हणून वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे.
भातलावणीच्या वेळापत्रकावर परिणाम
बदलत्या हवामानामुळे पावसाच्या आगमनाचा निश्चित अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अनेकदा सुरुवातीला चांगला पाऊत पडतो, त्यामुळे शेतकरी पेरणी करतात; मात्र त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने रोपे सुकण्याचा धोका निर्माण होतो. दुसरीकडे, उशिरा पेरणी केल्यास अचानक होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातलावणीचे नुकसान होते. यामुळे पारंपरिक शेतीचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावे लागत आहेत. वाढत्या अनिश्चिततेमुळे शेतीचा खर्चही वाढत आहे.