

पालघर: खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेली शेतमशागतीची सर्व कामे जिल्ह्यात पूर्ण झाली असूनही जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लागवडीच्या नियोजनात गुंतलेला बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्याने पेरणीची कामे वेळेत सुरू झाली होती. मात्र यंदा मान्सून लांबल्याने खरीप हंगामाच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे सलग तीन ते चार वर्षांपासून मान्सूनच्या अनियमित आणि लहरी स्वरूपाचा फटका जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने बसत आहे. पालघर जिल्हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या पीक पद्धतीनुसार खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते.
एकूण 1 लाख 4 हजार 962 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 76 हजार 644 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लागवडीच्या सुमारे 73 टक्के क्षेत्र भात शेतीखाली आहे.
या मोठ्या प्रमाणावरील भात लागवडीमुळे दरवर्षी बियाण्यांची मागणीही लक्षणीय राहते. जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणपणे 15 ते 16 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासते.पालघर तालुक्यातील धुकटण सारख्या गावांमधील काही शेतकऱ्यांनी पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी शेता पर्यंत आणून भात बियाण्याची पेरणी केली आहे.