Road Potholes Pudhari
रायगड

Neral Kashele Road Pothole | नव्याने डांबरीकरण, पहिल्याच पावसात रस्त्याची दैना! ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे

Neral Kashele Road Pothole | कशेळे-दोरेवाडी-खांडस मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था चव्हाट्यावर आणली असून, कशेळे-दोरेवाडी-खांडस मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबराचा थर उखडून रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.

त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कशेळे, दोरेवाडी, खांडस यांसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला असून, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नव्याने केलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेले? रस्त्याचे काम नुकतेच झाले असताना त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने डांबरीकरणाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता काही महिन्यातच खराब होत असेल, तर कामाची गुणवत्ता तपासली होती का, संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती का आणि ठेकेदारावर कोणती कारवाई होणार, असे सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्ता दुरुस्ती केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार पद्धतीने करण्यात यावी; अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • निकृष्ट कामामुळे ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : काही महिन्यांपूर्वीच झालेल्या डांबरीकरणाचा थर उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर संताप व्यक्त होत आहे.

  • कचरा व झाडांच्या फांद्यांमुळे आठवडी बाजारही अडचणीत : कशेळे येथील गुरुवारी भरणाऱ्या बाजारात कचरा अन् फांद्या हटवल्या नसल्याने आरोग्य अन् वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

आठवडी बाजारातही खड्ड्यांचा अडथळा...
गुरुवारी कशेळे येथे आठवडी बाजार भरत असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला तुटलेल्या झाडांच्या फांद्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात पडून असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा, फांद्या मागील जवळपास महिनाभरापासून हटवण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कचरा साचल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कशेळे-नेरळ मार्गही खड्ड्यांच्या विळख्यात...
दरम्यान, कशेळे-नेरळ मार्गावरील बाजारपेठ परिसरातही मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली असली तरी, नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्याची इतक्या लवकर दुरावस्था होणे ही बाब गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तातडीने खड्डे बुजवा, कचरा हटवा..
कशेळे-दोरेवाडी-खांडस मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, रस्त्यालगत पडलेल्या झाडांच्या फांद्या व कचरा त्वरीत हटवावा, निकृष्ट डांबरीकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिक, वाहनचालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT