

रायगड: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट आणि सुधागड तालुक्यातील भिरा परिसराने यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचा नवा विक्रम नोंदवला आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत ताम्हाणी येथे ७२७१ मिमी तर भिरा येथे तब्बल ७२७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून हा परिसर अव्वल ठरल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अतिवृष्टीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मेघालयातील चेरापुंजी आणि मावसिनरामलाही ताम्हाणी-भिराने मागे टाकले आहे.
याच कालावधीत चेरापुंजी येथे २५०० मिमी, मावसिनराम येथे २८०० मिमी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ५,४१० मिमी, तर कर्जत तालुक्यातील माथेरान येथे ४,९५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे ताम्हाणी-भिरा परिसरातील पावसाच्या नोंदींनी विक्रमी झेप घेतली आहे.
अरबी समुद्राकडून येणारे दक्षिण-पश्चिम मान्सून वारे सह्याद्रीच्या उंच कड्यांवर धडकत असल्याने ताम्हाणी घाट परिसरात ओरोग्राफिक म्हणजेच डोंगराळ पावसाची तीव्रता वाढते. ताम्हाणी घाटाची भौगोलिक रचना आणि सभोवतालच्या उंच डोंगररांगांमुळे ढगांचा मुक्काम या परिसरात वाढतो.
जुलैमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनचा द्रोणीय प्रभाव उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर राहिला. जुलैच्या मध्यात ताम्हाणी-भिरा परिसरात सलग पाच दिवस दररोज ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने एकूण पर्जन्यमानात मोठी वाढ झाली, असे भूगोलतज्ज्ञ प्रा. डॉ. समीर बुटाला यांनी सांगितले.
अभूतपूर्व पावसामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा आणि सावित्री नद्यांना अनेकदा पूर आला. भिरा येथील टाटा पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पाचा जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे.