Kasadi River Pollution pudhari photo
रायगड

Kasadi River Pollution : कासाडी नदीच्या प्रदुषणाने मत्‍स्‍यजीवन धोक्यात

विकासाच्या झगमगाटात नदीचा झालाय नाला; अस्‍वच्‍छ दुषित पाण्याने जलचरांचे मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी : पनवेल आणि तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या कासाडी नदीत मोठ्या प्रमाणावर रासायणिक या नदीचे पाणी दुषीत झाले आहे.आज जणू स्वतःचाच प्रश्न पडला आहे. माझा खरा रंग कोणता? ज्या ठिकाणी माझा उगम होतो, तिथे माझे पाणी कसे असते आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचताना माझा रंग असा का बदलतो? हा प्रश्न केवळ नदीचा नसून नदीच्या काठावर राहणाऱ्या हजारो नागरिकांचाही झाला आहे.

अनेक वर्षांपासून कासाडी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. नदीच्या पाण्याचा बदललेला रंग, परिसरात पसरणारी तीव्र दुर्गंधी आणि पाण्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नदीकडे पाहिल्यानंतर ती नैसर्गिक जलस्रोत आहे की औद्योगिक सांडपाण्याचा प्रवाह, असा प्रश्न उपस्थित होतो.

तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार होत असताना उद्योगधंद्यांची संख्या वाढली. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे झाली. नदी प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी पाहणी, बैठका आणि उपाययोजनांची चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात नदीच्या पाण्याचा रंग आणि दुर्गंधीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र नागरिक मांडत आहेत.

नदीच्या संरक्षणासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली गेली, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर किती कारवाई झाली आणि आजपर्यंत किती निधी खर्च झाला, याचा हिशेब प्रशासनाने जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. केवळ बैठका आणि आश्वासनांनी नदीचे प्रदूषण थांबणार आहे का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

एमआयडीसीतील दुषित पाणी थेट नदीपात्रात

माझ्या काठावर विकासाच्या उंच इमारती उभ्या राहत आहेत; पण माझ्या अस्तित्वाचे काय? माझ्या पाण्याचा खरा रंग कोणता, हे तरी मला एकदा सांगाल का? तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या पाण्याचा बदललेला रंग आणि पुलाच्या बाजूला उभ्या राहत असलेल्या उंच इमारती. विकासाच्या झगमगाटात नदीचे अस्तित्व मात्र धोक्यात आले असून, प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

जलचर पक्षी परिसंस्‍थेला धोका

नदी म्हणजे केवळ वाहणारे पाणी नव्हे, तर ती परिसरातील पर्यावरणाची जीवनवाहिनी असते. तिच्यावर अनेक जलचर, पक्षी आणि नैसर्गिक परिसंस्था अवलंबून असतात. नदी प्रदूषित झाली तर त्याचा परिणाम केवळ पाण्यावर होत नाही, तर संपूर्ण पर्यावरणावर होतो. त्यामुळे कासाडी नदीचे प्रदूषण हा केवळ एका नदीचा प्रश्न राहिलेला नाही, तर भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. प्रशासनाने नदीच्या उगमापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत पाण्याची गुणवत्ता तपासावी, प्रदूषणाचे स्रोत शोधावेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणांची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT