Raigad District Water Issue
कर्जत : शहराची व्याप्ती पाहता भविष्यात तालुक्यात धरणे असूनही त्याचे पाणी न मिळाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कर्जतकरांवर टाहोच फोडण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हरित पट्टा म्हणून घोषित असलेल्या कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणात निसर्ग संपदा लाभली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच येथील भौगोलिक स्थिती धरणे उभारण्यासाठी योग्य असल्याने या तालुक्यात यापूर्वी अनेक छोटे-मोठे धरण डॅम बंधारे उभारण्यात आलेले आहेत आणि आता नव्याने हजार ते अकराशे कोटी खर्च करून पोशीर आणि शिलार येथे दोन मोठी जलाशयाची साठा करणारी धरणे बांधण्यात येणार आहेत. मात्र खेदाची बाब म्हणजे यापूर्वीची धरणे आणि आत्ता नव्याने उभारण्यात तथा बांधण्यात येणार्या धरणांचे पाणीही कर्जतकरांना मिळणार नसून त्या पाण्याचा उपभोग मुंबई, ठाणे उपनगरातील भागांना तथा शहरांना मिळणार आहे.
एकीकडे कर्जत आणि आजूबाजूच्या परिसराकडे तिसरी मुंबई म्हणून पाहिले जाते. पुढील वर्षभरात कर्जत पनवेल लोकल सुरू होणार आहे. त्यामुळे साहजिकच कर्जत शहराची व्याप्ती अधिकच वाढून पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता कर्जत शहराला 24 तास पाणी मिळावे याचबरोबर दुर्गम ग्रामीण भागातील गावे वाड्यापाड्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी तसेच तालुक्यातील शेतीलाही मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी तालुक्यात एखाद्या हक्काच्या धरणाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. मात्र या उलट परिस्थिती तालुक्यातील धरणांची आहे तथा भविष्यात उभारण्यात येणार्या धरणांच्या बाबतीतील म्हटले तरी गैर ठरणार नाही. अगदी कर्जत विधानसभा मतदारसंघातील मोरबे धरणाचे उदाहरण जरी लक्षात घेतले तरी हे लक्षात येईल की या धरणाचे पाणी नवी मुंबईला दिले गेले आहे. त्यामुळे या धरणाचा फायदा कर्जत मतदारसंघातील शेतकर्यांना, नागरिकांना हवा तसा झालेला नाही.
याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील गेली अनेक वर्ष वादातील कोंढाणे धरणाचे काम आता नव्याने सुरू होणार आहे मात्र या धरणाचे पाणी देखील सिडको यांनी घेतले आहे. त्यामुळे कोंढाणे धरणाचा फायदा सुद्धा कर्जतकरांना मिळणार नसल्याचे उघड झाले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार येथील मोठा जलसाठा असलेल्या धरण उभारणीस मंजुरी दिली आहे. मात्र या धरणांचे पाणी सुद्धा मुंबई आणि ठाणे या उपनगरातील शहरांना पुरविले जाणार आहे त्यामुळे साहजिकच कर्जत मध्ये धरण उभारूनही या या धरणातील पाण्याचा उपयोग वाढत्या कर्जत शहराला तसेच कर्जत तालुक्यातील शेतीला अपेक्षित असा होणार नसल्याचे दिसून येत आहे यामुळे येथील लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला असा काहीसा असल्याची उद्दीग्नता लोकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
तालुक्यात आता दोन आठवड्यांपूर्वी मंजुरी मिळालेले पोशीर आणि शिलार येथे उभारण्यात येणार्या धरणांचे पाणी सुद्धा मुंबई ठाणे उपनगराला दिले जाणार असल्याने या धरणांचा उपयोग कर्जत शहर पाणी योजनेसाठी होणार नाही हे दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत कर्जत शहराला पेज नदीवर आधारित पाणी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या नदीला बारमाही सोडण्यात येणारे पाणी हे टाटा विद्युत प्रकल्पातून येत आहे. थोडक्यात टाटा भिवपुरी विद्युत प्रकल्पाच्या ओंजळीने कर्जत शहराची तहान भागत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नवीन धरणांच्या बाबतीत विचार करता जमेची बाजू एवढीच आहे की, या पाण्याच्या साठ्यामुळे या परिसरातील भूगर्भातील जलपातळी उंचावण्यास मदत होईल आणि धरणांच्या आजूबाजूच्या परिसरातील काही शेतकर्यांना त्याचा काही अंशी त्या पाण्याचा लाभ होईल.