Karjat Station Platform Extension  pudhari photo
रायगड

Karjat Station Platform Extension : कर्जत स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम रखडले

प्लॅटफॉर्मच्या कमी लांबीमुळे गाड्या 'दोनदा' थांबवाव्या लागतात; प्रवाशांमध्ये संभ्रम, अपघाताचा मोठा धोका

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या विस्तारीकरणाच्या कामाला रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत लालफितीचा फटका बसला आहे. रेल्वे बोर्डाकडून इलेक्ट्रॉनिक इंटरलोकिंगच्या कामाला मंजुरी न मिळाल्यामुळे हे काम सध्या पूर्णपणे रखडले असून, काम कधी पूर्ण होणार याबाबत निश्चित तारीख सांगण्यासही प्रशासनाने हात वर केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या कार्यालयाने निश्चित वेळ सांगता येणार नाही असे कळविले आहे.

कर्जत रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी कमी आहे असल्याने काही गाड्या दोनदा (दोन टप्प्यांत) थांबवाव्या लागतात. या मुळे गाडीतून उतरणारे आणि चढणारे प्रवासी पूर्णपणे गोंधळून जातात. या गोंधळामुळे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे कर्जतच्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास अत्यंत क्लेशदायक ठरत आहे.

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीअभावी काम ठप्प

वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक) शिवराज मानसपुर यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत उत्तरात रेल्वेने आपली हतबलता व्यक्त केली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या जागेत संकेत आणि दूरसंचार) विभागाचे काही साहित्य येत आहेत. हे साहित्य हलवण्याचे काम 'इलेक्ट्रॉनिक इंटरलोकिंग' च्या कामाशी जोडलेले आहे, ज्याला दिल्लीतील रेल्वे बोर्डाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. रेल्वे बोर्डाकडून कधी मंजुरी मिळेल याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे हे काम अनिश्चित काळासाठी रखडले आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात

"प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने प्रवाशांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्याकडे रेल्वे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. गाड्या दोनदा थांबवाव्या लागत असल्यामुळे प्रवासी गोंधळतात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. रेल्वेकडून केवळ तारखा बदलून दिल्या जात आहेत. आधी फेब्रुवारी २०२६, मग डिसेंबर २०२६ आणि आता तर काम कधी पूर्ण होईल हे सांगण्यासच नकार दिला जात आहे. केवळ दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या एका मंजुरीसाठी स्थानिक प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. पाठपुरावा आणि लढा सुरूच राहील." असे पंकज ओसवाल यांनी जाहीर केले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार बदलल्या डेडलाईन्स

या कामाबाबत रेल्वे प्रशासनाने गंभीर राहण्याऐवजी वारंवार केवळ तारखा बदलून प्रवाशांची दिशाभूल केली आहे असे ओसवाल यांचे म्हणणे आहे. ज्याचा संपूर्ण घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:

  • 1 जुलै 2025 मधील पहिले आश्वासन: रेल्वेने अधिकृत पत्रात लेखी दिले होते की, लोणावळा बाजूकडील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर सीएसएमटी बाजूकडील काम सुरू केले जाईल आणि हे काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल.

  • 2 मार्च 2026 मधील दुसरी तारीख: फेब्रुवारी 2026 ची डेडलाईन पाळण्यात रेल्वे अपयशी ठरली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (CRS) मंजुरीचे कारण पुढे करत काम पूर्ण होण्याची नवीन तारीख डिसेंबर 2026 देण्यात आली.

  • 3 ऑक्टोबर 2026 मधील धक्कादायक वळण (सद्यस्थिती): आता डिसेंबर 2026 ची तारीख जवळ आल्यावर रेल्वेने आपले जुने सर्व दावे फेटाळून लावत, काम पूर्ण होण्याची कोणतीही निश्चित तारीख देण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT