

सापाड : योगेश गोडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख गड-किल्ल्यांपुरती मर्यादित नव्हती. तर ती समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण, सागरी व्यापाराचे नियंत्रण आणि शत्रूच्या आरमारी हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी उभारलेल्या मराठा आरमारालाही भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
याच ऐतिहासिक वारशाचे दर्शन नव्या पिढीला घडवण्यासाठी कल्याण पूर्वेतील कचोरे-नेतिवली टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रस्तावासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला जागेचा अभ्यास, उपलब्ध क्षेत्रफळ आणि स्मारकाच्या स्वरूपाचे नियोजन करण्यात येणार आहे.
शिवरायांच्या अरमाराच्या स्मारकात जहाजांच्या प्रतिकृती, मराठा आरमाराचा इतिहास, सागरी मोहिमांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचा समावेश आहे. मात्र, या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सार्वजनिकरीत्या स्पष्ट झालेला नसल्याने स्मारकाचे स्वरूप, त्याची उंची, क्षेत्रफळा विषयी निश्चित माहिती समोर आली नाही.
नेतीवली टेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचा उद्देश महाराजांचा पुतळा उभारण्याचा नसून मराठा आरमाराची निर्मिती, त्याची रचना, जहाजांचे प्रकार, सागरी मोहिमा आणि त्या काळातील नौदल सामर्थ्य याची माहिती अभ्यासपूर्ण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देताना स्मारकाच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना आहे.
हा पुतळा स्वराज्याची स्थापना, सागरी संरक्षणाची दूरदृष्टी आणि मराठा आरमाराच्या इतिहासाचे प्रतीक ठरू शकतो. तर मराठा आरमारातील जहाजांची मोठ्या आकारातील प्रतिकृती हे या स्मारकाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे त्या काळातील जहाजांची बांधणी, त्यांची क्षमता, वापर आणि समुद्रातील हालचाली यांची माहिती देखील प्रतिकृतींसोबत देण्यात येणार असल्याने आजच्या पिढीला आरमाराची संरचना समजून घेता येईल.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्यामागील उद्देश, सागरी किल्ल्यांचे महत्त्व, किनारपट्टीच्या संरक्षणाची व्यवस्था आणि मराठा आरमाराच्या ऐतिहासिक मोहिमा यांचे दस्तावेज, नकाशे, छायाचित्रे व माहिती फलकांच्या माध्यमातून सादरीकरण आरमाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठा आरमाराची माहिती मिळावी, यासाठी मार्गदर्शित भेटी, ऐतिहासिक नकाशे, माहितीपट आणि डिजिटल सादरीकरणाचा विचार देखील करण्यात येणार आहे. यामुळे शिव स्मारक पर्यटनस्थळ न राहता इतिहासाच्या अभ्यासाचे केंद्रबिंदू ठरू शकेल.
या अपेक्षेने खा. डॉ. श्रीकांत शिंदे आरमाराची उभारणी करणार असल्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. या सर्व घटकांचा समावेश करण्यासाठी किती जागा आवश्यक असेल, कोणती वास्तुरचना योग्य ठरेल आणि कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील, याचा निर्णय सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवालानंतरच समोर येणार आहे. कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी ही भौगोलिक उंचवट्याचे स्वरूप असून या परिसराला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडणारा महत्त्वाचा संदर्भही आहे.
नेतिवली टेकडीवरील गुंफेचा संबंध आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याशी जोडला जातो. या गुंफेपर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पोहोचता यावे, तसेच तेथे ऐतिहासिक स्मारक उभारावे, अशी मागणी निवृत्त कमांडर डॉ. सुनील कांबळे यांनी केली होती. या परिसरात वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्रगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
त्यामुळे नेतिवली टेकडीचा विकास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या प्रस्तावित स्मारकाबरोबरच वासुदेव बळवंत फडके यांच्या गुंफेचा ऐतिहासिक संदर्भ जतन करण्याचाही विचार केंद्रस्थानी ठेवून नेतीवली टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार उभारण्याचा निर्णय खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे. तर नेतिवली आणि कचोरे टेकड्यांवरील अतिक्रमणे, वृक्षाच्छादनाचा अभाव आणि पावसाळ्यात निर्माण होणारा दरडीचा धोका या पार्श्वभूमीवर स्मारक उभारण्यापूर्वी टेकडीची भूगर्भीय स्थिती, मातीची स्थिरता, पावसाच्या पाण्याचा निचरा, नैसर्गिक उतार आणि परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे नेतीवली टेकडीवरील काही जमिनी वन विभागाची, तर काही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे जागे संदर्भातील संपूर्ण परवानग्या देखील डॉ. श्रीकांत शिंदे घेणार आहेत. विशेष म्हणजे टेकडीवर मोठ्या स्वरूपाचे स्मारक उभारणे हे सामान्य सपाट भूखंडावर बांधकाम करण्यापेक्षा वेगळे असते. त्यामुळे जागेचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतरच बांधकामाच्या पद्धतीत विषयी माहिती मिळेल. त्यामुळे उपलब्ध क्षेत्रफळ, जमिनीच्या सीमा, उतार, प्रवेशमार्ग, जमीन कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे आणि कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून मातीची धारणक्षमता, पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, दरडीचा धोका, वृक्षसंपदा आणि टेकडीच्या नैसर्गिक स्थितीवर होणारा परिणाम तपासावा लागेल.
त्याचबरोबर स्मारकाचे क्षेत्रफळ, पुतळ्याचे स्थान, जहाजांच्या प्रतिकृती, माहिती दालन, वाहनतळ, पायवाटा, दिव्यांगांसाठी प्रवेश, पाणीपुरवठा व स्वच्छतागृहांसारख्या सुविधांचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर अंदाजित खर्च, निधीचे स्रोत व बांधकामाची कालमर्यादा ठरू शकेल. जमीन मालकी, पर्यावरणविषयक अटी आणि इतर आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित प्राधिकरणाला प्रत्यक्ष बांधकामाची प्रक्रिया करता येईल.
प्रकल्प शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानंतर केडीएमसी प्रशासन कोणता आराखडा तयार करते आणि प्रकल्पाला पुढील मंजुरी कधी मिळते, याकडे आता कल्याणकरांचे लक्ष लागले आहे. शिवरायांच्या आरमाराचा गौरवशाली इतिहास, नेतिवली टेकडीचा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याशी संबंधित वारसा आणि परिसराचे पर्यावरणीय संवर्धन यांची सांगड घालून विकास झाला, तर हा प्रकल्प कल्याणसाठी ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो.
स्मारकामुळे कल्याणच्या इतिहासाला नवी ओळख मिळेल
नेतिवली टेकडीवरील स्मारकामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता असली, तरी विकासाच्या प्रक्रियेत टेकडीची सुरक्षितता आणि नैसर्गिक रचना जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणावर माती काढणे, उतार बदलणे त्याचबरोबर नियोजनाशिवाय बांधकाम करणे टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य अभियांत्रिकी महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर स्मारकापर्यंत सुरक्षित रस्ता, पादचारी मार्ग, आपत्कालीन वाहनांची सुविधा आणि गर्दीचे व्यवस्थापन यांचाही विचार करावा लागेल. टेकडीवरील ऐतिहासिक गुंफेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली असल्याने, या परिसराच्या एकात्मिक विकासात ऐतिहासिक स्थळांची सुलभता महत्त्वाचा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे स्मारक प्रत्यक्षात साकारल्यास कल्याणच्या इतिहासाला नवी ओळख मिळेल. परिणामी मराठा आरमाराच्या इतिहासाचा अभ्यास, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम आणि पर्यटनाच्या संधी निर्माण होणार आहे. मात्र, या संकल्पनेचे प्रत्यक्ष स्मारकात रूपांतर होण्यासाठी सर्वेक्षण, जागेची उपलब्धता, तांत्रिक आराखडा, आवश्यक परवानग्या आणि निधी यांबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.