आनंद सकपाळ
नेरळ: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे उभारल्या जात असलेल्या नवीन कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यापर्यंत हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान रेल्वेने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.
कर्जत-पनवेल नवीन रेल्वे मार्ग 29.6 किलोमीटरचा आहे. यामध्ये नधळ, वावर्ले आणि किरवली असे एकूण 3 बोगदे असूनत्यांची एकूण लांबी 3.2 किमी आहे. या बोगद्यांसाठी अंदाजे 300 कोटी रुपये खर्च झाला आहे. तर वावर्ले हा 2.63 किमी लांबीचा बोगदा आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे जाळ्यातील सर्वात लांब बोगदा म्हणून त्याची ओळख ठरणार आहे. या तीनही बोगद्यांचे ब्रेकथ्रू हे अंतिम टप्प्यात आले आहेत.
या मार्गावर 47 लहान-मोठे पूल आहेत. या पुलांचे काम देखील पूर्ण झाले आहे. या नवीन कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशा एकूण पाच रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावरील रेल्वे रुळांची कामे ही बॅलास्टलेस ट्रॅक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात आली आहेत.
तसेच या रेल्वे मार्गावर चौक ते कर्जत अशी रेल्वे इंजिनची टेस्ट देखील घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याची माहिती ही रेल्वे प्रशासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या चित्रीकरणामधून समोर येत आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत या रेल्वे मार्गाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून हा नवीन रेल्वे मार्ग 2026 च्या पावसाळ्यानंतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार 782 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत प्रवासादरम्यानचा सध्याचा लागणारा वेळ हा कमी लागणार होणार आहे. तर लवकरच पनवेल ते कर्जत थेट लोकल सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे पनवेल,
कर्जत, उलवे, नेरळ या भागांतील निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील नागरीकांना याचा फायदा होणार असून, विकासाला देखील गती मिळणार आहे.
सध्या रस्तेमार्गे कर्जतवरून पनवेल गाठण्यासाठी लागणारा सुमारे एक ते दीड तासांचा वेळ या नव्या रेल्वेमार्गामुळे अवघ्या 40 मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना पनवेल, नवी मुंबई आदी शहरांकडे कामानिमित्त जाण्यासाठी या रेल्वेमार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या नवीन कर्जत-पनवेल रेल्वे मार्गामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गर्दीचे नियोजन होऊन ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे इंजिनाची चाचणी यशस्वी
या रेल्वे मार्गावर चौक ते कर्जत अशी रेल्वे इंजिनाची चाचणी देखील घेण्यात आली असून, ती यशस्वी झाल्याची माहिती ही रेल्वे प्रशासनामार्फत सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात आलेल्या चित्रीकरणामधून समोर येत आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत या रेल्वे मार्गाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाल्याची, तसेच हा नवीन रेल्वे मार्ग 2026 च्या पावसाळ्यानंतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.