Raigad news | आक्षी साखर प्रकल्पामुळे मच्छीमारांना दिलासा

काही वेळा कमी भरतीमुळे बोट अडकण्याचा धोका देखील निर्माण होतो
Raigad news
Raigad news
Published on
Updated on

अलिबाग : तालुक्यातील आक्षी साखर येथे राबविण्यात येत असलेला ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता आणि खाडीतील गाळ काढण्याचा प्रकल्प परिसरातील मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे खाडीमुखाशी साचणाऱ्या गाळाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन बोटींना सुरक्षित व सुलभ ये-जा करता येणार आहे.

सध्या खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मासेमारी करून परतणाऱ्या बोटींना थेट बंदरात पोहोचणे कठीण होते. अनेक वेळा मच्छीमारांना भरतीची वाट पाहावी लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होतो, इंधन खर्च वाढतो आणि मासळीची गुणवत्ता घसरते. काही वेळा कमी भरतीमुळे बोट अडकण्याचा धोका देखील निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत २२३५ मीटर लांबीचा लाटरोधक (ग्रोयान्स) बंधारा उभारण्यात येणार आहे. तसेच खाडीमुख व आतील भागातील साचलेला गाळ काढण्यात येणार आहे. याशिवाय ८० मीटर लांब व १० मीटर रुंद अशा दोन जेट्टी उभारल्या जाणार असून बोटी उभी करण्यासाठी व माल चढ-उतारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या जेट्टींना जोडण्यासाठी ४०० मीटर लांबीचा व ७ मीटर रुंदीचा रस्ता देखील तयार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे १५९.९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ संस्थांकडून तांत्रिक अभ्यास करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे, त्यामुळे हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे. या कामामुळे मच्छीमारांना कोणत्याही भरती-ओहोटीच्या परिस्थितीत बोटींना सुरक्षितपणे बंदरात ये-जा करता येईल. गाळामुळे होणारा विलंब टळून वेळ व इंधन खर्चात बचत होईल. तसेच मासळीची गुणवत्ता टिकून राहिल्याने बाजारभावही चांगला मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे केवळ मासेमारी क्षेत्रालाच नव्हे तर किनारपट्टीवरील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. सुधारित पायाभूत सुविधा आणि सुरक्षित जेट्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news