

रायगड: रोजगाराच्या शोधात गेलेल्या एका आदिवासी कुटुंबाला वेठबिगारीच्या नरकयातना भोगाव्या लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील इंदापूर येथे वीटभट्टी मालकाच्या तावडीत अडकलेल्या एका 16 वर्षीय मुलाची रायगड पोलिसांनी अत्यंत शिताफीने सुटका केली आहे.गेली चार वर्षे हा मुलगा वेठबिगारीचे काम करत होता.
रोहा तालुक्यातील धगडवाडी आदिवासीवाडी येथील कैलास वाघमारे हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे शब्बीर दस्तगीर शेख यांच्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते.
मात्र, तिथे गेल्यावर कामाचा योग्य हिशोब न देणे, वेळेवर धान्य न देणे आणि सतत मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले. या जाचाला कंटाळून वाघमारे दांपत्य आपल्या दोन मुलांसह तिथून पळून येण्यात यशस्वी झाले, मात्र त्यांचा 16 वर्षीय मुलगा विशाल याला मालकाने तिथेच ओलीस धरून ठेवले होते.
कोलाड पोलिसांनी तत्काळ वालचंद नगर गाठले
वाघमारे कुटूंबाची ही गंभीर परिस्थिती सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या प्रमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना मिळाली. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना माहिती दिली.
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ कोलाड पोलिसांना आदेश देवून तातडीने हालचाली केल्या. 5 एप्रिल 2026 रोजी कोलाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार मुलाच्या वडिलांसह वालचंदनगर येथे पोहोचले.
आणि विशालची सुटका....
स्थानिक पोलिसांच्या मदतीने शब्बीर दस्तगीर शेख यांच्या विटभट्टीवर पोहोचून विशालची सुटका करण्यात आली आणि त्याला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.पालकांनी निश्वास टाकला आहे.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे, कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे आणि पथकातील एस.जी. भोजकर व एस.बी. मेरगळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांचे विशेष आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:नोंदणी करा: रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाताना ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटीलांकडे नोंदणी करा. माहिती जवळ ठेवा: आधारकार्ड, रेशनकार्ड सोबत ठेवा आणि मालकाचा पूर्ण पत्ता व फोन नंबर नातेवाईकांना द्या.मुलांचे शिक्षण: मुलांना कामाच्या ठिकाणी नेण्याऐवजी शासनाच्या हंगामी वस्तीगृहात ठेवण्याचा प्रयत्न करा.अन्याय सोसू नका: पगार रोखणे किंवा ओलीस ठेवणे हा वेठबिगारी अंतर्गत गुन्हा आहे. अशा वेळी तात्काळ 100 किंवा 112 या क्रमांकावर किंवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.