कर्जत: मागील काही महिन्यांपासून कर्जत तालुक्यात रात्रीच्या वेळेस अवैधरित्या उत्खनन करत माती वाळू डबर यांची डंपर ट्रॅक्टर या वाहनातून वाहतूक सुरू आहे. भिसेगाव येथील डोंगर परिसरात सुद्धा उत्खनन सुरू असून रात्रीच्या वेळेस नंबर प्लेट नसलेल्या डंपर मधून डबर मातीची वाहतूक सुरू असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
यातील काही रहिवाशांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देऊन सुद्धा या विरोधात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अवैध खनिज संपत्तीच्या वाहतुकीचा हा रात्रीस खेळ चाले अजून किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
रात्रीच्या वेळेस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते. तरीसुद्धा या गाड्यांना कोणी सुद्धा रोखतांना अथवा त्यांच्यावर कार्यवाही करताना त्या गाड्यांचे विचारपूस करताना दिसून येत नाही. कदाचित त्यामुळेच या अवैध वाहतुकीवर प्रशासनाचा अंकुश राहिलेला दिसत नाही.
सूर्यास्तानंतर रात्रीचे १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत कर्जत-मुरबाड रोड, कर्जत-पळसदरी-खोपोली रोड आणि नदीकाठच्या कच्च्या रस्त्यांवर डंपरची ये-जा सुरू होते. श्रीराम पूल, चार फाटा, पळसदरी-चौक या मुख्य रस्त्याच्या मधोमध या वाहतुकीला रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रात्री ते मध्यरात्री डब्बर सारखे डंपर भरून भरधाव वेगाने तहसीलदार, महसूल विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळतात. ओव्हरलोड डंपर रस्त्यावर दगड-माती सांडवतात. नंबर प्लेट झाकले गाड्या हे नित्याचं झालं आहे.
“रात्री 2 वा. डंपरच्या आवाजाने झोप मोडते. रस्ता हादरतो. पण १०० नंबरला फोन केला तरी ‘पेट्रोलिंग पाठवतो’ असे म्हणतात पण प्रत्यक्षात कोणी येत नाही,” तर कधी कधी पोलिस ठाण्याचा नंबर लागत नाही त्यात थेट पोलिसांना संपर्क केला की ते देखील कॉल उचलत नाही. अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासन कुठे आहे?
कर्जत पोलीस ठाण्याकडे रात्रपाळी पेट्रोलिंगची जबाबदारी आहे. पण मनुष्यबळ कमी आणि इतर गुन्ह्यांचा ताण यामुळे अशा बेकायदा वाहतूक करणाऱ्या डंपरवर लक्ष देणं दुय्यम ठरवलं जातंय का ? असा उद्दीग्न सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
या बेकायदा वाहतुकीचे होणारे गंभीर परिणाम
रस्ते उद्ध्वस्त: ओव्हरलोड डंपरमुळे नवे रस्तेही 6 महिन्यात खड्डेमय होतात.
अपघात वाढले: ही रात्री वेगात जाणाऱ्या डंपरमुळे दुचाकीस्वारांचे अपघातवाढले आहेत.
सरकारी महसुलाचे नुकसान: परवानगीशिवाय होणाऱ्या वाळू-उत्खन आणि वाहतुकीवर रॉयल्टी मिळत नाही.
नागरिकांची मागणी
रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत कडक नाकाबंदी: कर्जतच्या मुख्य ३ एंट्रीपॉइंटवर पोलीस पथक तैनात करावं.
RTO + पोलीस संयुक्त कारवाई:फक्त दंड नको, डंपर जप्त करून थेट गुन्हा दाखल करावा.
मंडळाधिकारी यांना याबाबत सांगितले आहे. त्या जागेचा पंचनामा करून सबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत