कर्जत: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला चाळीस लाख रुपये किमतीची आरोग्य उपकरणे देण्यात आली. विशेष म्हणजे ज्या उपकरणांची उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यकता आहे. तीच उपकरणे उपलब्ध करून देण्यात आल्याने गरीब व गरजू रुग्णांची आरोग्य सेवा अधिक चांगली होऊ शकते.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य उपकरणे वाटप सोहळ्याचे आयोजन रॉयल गार्डन सभागृहात करण्यात आले होते. समारंभाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून समारंभाचे उदघाट्न करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय म्हस्कर, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. श्री सदस्य भगवान भोसले आणि श्रीधर बुंधाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विकास चित्ते यांनी प्रस्ताविकात, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्य बैठकीच्या माध्यमातून ज्ञान दानाचे व व्यसनमुक्ती करण्याचे कार्य सुरु केले. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या कार्याचा जगभर प्रसार केला.
तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करुन अनेक समजपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छता अभियान, महाआरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण व संगोपन, निर्माल्यापासून खत निर्मिती, जनसामान्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय उपकारणांचे वाटप आदी उपक्रम जगभरात राबविले आणि अजूनही राबवित आहेत, असे स्पष्ट केले.
याप्रसंगी कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी आणलेली चाळीस लाख रुपये किंमतीची आरोग्य उपकरणे मान्यवरांच्या हस्ते डॉ. विजय म्हस्कर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी डॉ. म्हस्कर यांनी, आज देण्यात आलेली आरोग्य उपकारणांची देणगी अमूल्य आहे. नुकतीच डायलीसिसच्या उपकरणांचे लोकार्पण झाले आहे. त्यासाठी सहा महिने पुरतील इतकी औषधे प्रतिष्ठानच्या वतीने आज देणगी स्वरूपात मिळाली.
त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार करणे अधिक सुलभ होईल. आपल्या रुग्णालयात टुडी इको तपासणीची कमतरता आहे. ती एका महिनाभरात उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे सांगितले. अनिल सोनाने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपगराध्यक्ष संतोष पाटील, माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक अशोक राऊत, तातू पेमारे, अशोक भागित, आदी उपस्थित होते.
मी अनेक वर्षांपासून डॉ. धर्माधिकारी यांचे कार्य जवळून बघत आलो आहे. त्यांचे नियोजन व नेटवर्क आम्हा शासकीय यंत्रणेला मागे टाकेल असे आहे. श्री सदस्य कोणत्याही प्रलोभनाने काम करीत नाहीत तर अगदी जीवाचे रान करून कोणतीही अपेक्षा न करता सातत्याने काम करीत असतात. ते स्वच्छता अभियान राबवतात. त्यांचे ते कार्य पाहुणे आम्हाला लाज वाटते. साधा चहा सुद्धा ते कुणा कडून घेत नाहीत. त्यांच्या बरोबर सर्व काही असते. म्हणून सर्व श्री सदस्यांचा आम्हाला अभिमान आहे.- प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी, कर्जत