Karanja Fishing Harbour Pudhari
रायगड

Karanja Fishing Harbour: करंजा मच्छीमार बंदराचा कायापालट! गाळाची समस्या दूर करण्यासाठी १३६.७६ कोटींची कामे सुरू

गाळाची समस्या दूर करण्यासह ३७० मीटर अतिरिक्त धक्काभिंत, प्रवेशमार्ग रुंदीकरण आणि बोट पार्किंगची कामे

पुढारी वृत्तसेवा

कोप्रोली-उरण : मागील दोन वर्षांपासून १००० क्षमतेच्या करंजा मच्छीमार बंदरात साचणाऱ्या गाळाच्या समस्येमुळे हजारो मच्छीमार त्रस्त आहेत. मात्र प्रवेश मार्गावरील गाळ, अतिरिक्त रुंदीकरण, ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्का भिंत, बोट पार्किंग आदी विविध विकासकामांसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १३६.७६ कोटी खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरू पाहाणारे करंजा मच्छीमार बंदर तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झाले आहे. तेव्हापासुन या करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारी हंगामात सुमारे ५५० कोटींची मासळीची निर्यात होत आहे.

मात्र अद्यावत करंजा मच्छीमार बंदर मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळाच्या समस्येमुळे अडचणीत आले आहे. गाळाच्या समस्येमुळे हजारो मच्छीमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरविण्यासाठी येणाऱ्या मच्छीमारांना आणि बंदरातुन मासळी उतरवून पुन्हा बाहेर जाण्यासाठी बंदरात बाहेरच चार- सहा तासांपर्यंत समुद्रातच वाट पाहावी लागते.

यामुळे बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात.त्यामुळे बंदरातील गाळ, अतिरिक्त लांबीची धक्का भिंत आणि इतर विविध समस्या दूर करण्याची सातत्याने मागणी येथील करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून केली जात होती.

अखेर करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा मच्छीमार बंदराच्या विविध प्रकारच्या २१ कामांसाठी १३६.७६ कोटी खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी दिली.

यामध्ये प्रामुख्याने ३७० मीटर लांबीची अतिरिक्त धक्काभिंत उभारण्याच्या कामासाठी २६ कोटी ७७ लाख ८८ हजार ६३२ कोटी तर प्रवेश मार्गावरील गाळ व रुंदीकरणाच्या कामासाठी २१ कोटी २५ लाख ४७ हजार ८३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

बंदरातील कॉक्रीटीकरण, लिलाव केंद्र -४, प्रशासकीय भवन, संपर्कासाठी रेडिओ भवन, उपहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाऊंड वॉल,सेव्हरेज ट्रिटमेंट प्लाण्ट, बर्फ फॅक्टरी ,१०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज,सेव्हरेज सिस्टीम, डिझेल पंप आदी विविध प्रकारच्या कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT