पोलादपूर : महाड - पोलादपूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या किल्ले कांगोरीगडावर मावळा प्रतिष्ठान-पोलादपूर संस्थेच्या वतीने तृतीय वर्धापनदिनानिमित्त किल्ले कांगोरीगड येथे शनिवार आणि रविवार अशा दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर व दिग्गज व्यक्तींची उपस्थिती लाभली.
दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात वारी परंपरेप्रमाणे वारकरी दिंडीने करण्यात आली. श्री कांगोरीदेवीच्या मंदिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची सन्मानपूर्वक मिरवणूक काढण्यात आली. कांगोरीदेवीची ओटी भरून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थितांच्या उत्साहात भर घालणारा, इतिहासाची साक्ष देणारा भव्य व दिमाखदार मशाल सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण किल्ले परिसर शिवकालीन तेजाने उजळून निघाला.
इतिहास अभ्यासक डॉ. आशुतोष बापट, संस्थेचे अध्यक्ष योगेश केसरकर,आणि धारकरी दीपक उतेकर, ह.भ.प.सहदेव सुतार आणि मनाली मालुसरे यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यानंतर पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी किल्ले राजगड अभ्यासक चैतन्य शिंदे यांनी किल्ल्याच्या ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्वा विषयी सविस्तर माहिती देत कार्यक्रमाची पहिल्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी गडावर अगदी सकाळी संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली. उपस्थित मान्यवर मंडळीना सन्माचिन्ह आणि दुर्गसंवर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.या दोन दिवसांत गडावर जवळपास दोनशे मावळे विविध ठिकाणांहून गडावर आले होते,या शिवभक्त आणि दुर्गसेवकांसाठी दोन दिवस महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती.
कांगोरीगडावरील हा दोन दिवसांचा कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी जयेंद्र पार्टे, ऋषिकेश शिंदे, सागर नलावडे, राजेश सणस, वैभव मोरे, प्रविण गोगावले, विश्वास दुर्गावळे, भावेश मोरे, निशिकांत लाड,अक्षय घावरे, रामचंद्र साने, निलेश मोरे, आकाश नरे, संचित कदम, लहू पवार, कुशल घाणेकर, जगदीश महाडिक, राजेश मालुसरे, ध्रुव सुंभे, सिद्धेश पंदिरकर,सागर कदम, सानिका जाधव, राज चांढवेकर, रोहित मालुसरे, प्रेम जगताप, आशिष मोरे यांचे सहकार्य लाभले.
उपस्थित गिर्यारोहक केतन फुलपगारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मावळा प्रतिष्ठान यांच्या विशेष प्रयत्नांनी कांगोरीगडाचा उत्तम प्रकारे विकास होत आहे, असे सांगत आगामी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
कांगोरीगडावरील येणाऱ्या भाविक-शिवभक्त-पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे,गडावर अससणाऱ्या पायवाटा सुरक्षित करून ठिकठिकाणी सुरक्षा रेलिंग लावण्याची गरज आहे. माचीवर येणारा रस्ता मशाल महोत्सव निमित्ताने गेल्या अनेक वर्षांनी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त झाला आहे,त्यामुळे हलकी लहान वाहने थेट माचीवर नेणे आता सोपे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे पक्के डांबरीकरण होण्याची आवश्यकता आहे.यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.