कामोठेत सिडकोच्या जागेवर अतिक्रमण pudhari photo
रायगड

Kamothe CIDCO land encroachment : कामोठेत सिडकोच्या जागेवर अतिक्रमण

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तातडीने कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः कामोठे सेक्टर 4 परिसरातील सिडकोच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून डेब्रिज आणि कचरा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडकोचे सहायक कार्यकारी अभियंता अजय गजानन पाटील यांनी कामोठे पोलीस ठाण्यात कामोठे गावातील रहिवाशी अनिकेत रामू म्हात्रे यांच्या विरोधात भारतीय न्याय साहिता कलम 271 आणि कलम 329 ( 3 ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सिकडोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार , अजय पाटील (वय 36, रा. आगरोळी गाव, सीबीडी बेलापूर) हे सध्या सिडकोच्या कळंबोली विभागात सहायक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कामोठे विभागात सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व रक्षक यांच्या मदतीने अतिक्रमण, डेब्रिज डंपिंग आणि नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी कामोठे येथील सेक्टर 4 मधील ‌‘जुही रेसीडन्सी‌’ येथील रहिवाशांकडून पाटील यांना तक्रार मिळाली होती. या तक्रारीनुसार, एन.डी.झेड. क्षेत्रातील सर्वे क्र. 84/3, 84/1बी, 84/4 आणि 84/5 या सीआयडीसीओच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर अनिकेत रामू म्हात्रे हा इसम बेकायदेशीरपणे बॅनर लावून डंपरमधून माती, डेब्रिज आणि कचरा टाकत असल्याची माहिती मिळाली.

या तक्रारीनंतर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अजय पाटील हे सुरक्षा अधिकारी मेघनाथ पालेकर, पर्यवेक्षक संतोष केळकर आणि सुरक्षा रक्षक माधव मालगण यांच्या पथकासह घटनास्थळी गेले. तपासणीदरम्यान त्यांनी पाहिले असता, संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणात माती व बांधकामाचे अवशेष टाकण्यात आले होते तसेच ‌‘प्रॉपर्टी उपलब्ध‌’ अशा मजकुराचे बॅनर लावलेले दिसले.

सदर जागेचा फोटो आणि पंचनामा दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी सिडको तर्फे कामोठे पोलिस ठाण्यात अनिकेत रामू म्हात्रे यांच्या विरोधात अधिकृत फिर्याद दिली. या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित इसमाने अतिक्रमण करून सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी कृती केली आहे.

भूखंड हडपण्याचा प्रकार : वकील समाधान काशिद

कामोठे सेक्टर 4 मधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर, डेब्रिज टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला सुरू केला होता, या परिसरातील नागरिकांना या बाबत माझ्याकडे तक्रार केल्या नंतर, संबंधित घटनेची माहिती आमही सिडको अधिकाऱ्यांना दिली आणि कारवाई करण्याची मागणी केली त्या नुसार सिडकोने आज प्रत्यक्षात येऊन कारवाई करत, मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणं करणाऱ्या भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे ॲड. समाधान काशिद यांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT