

अलिबाग ः अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वरसोली बीच परिसरात स्टॉलधारकांमधील वादातून परस्पर मारहाणीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या असून अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. वरसोली बीचवरील हातगाडी व स्टॉलधारक यांच्यामध्ये किरकोळ वाद सुरू असताना तो वाद हातघाईपर्यंत गेला. दरम्यान वाद सोडविण्यास गेलेल्या फिर्यादीस एका गटातील तिघा आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी व हाताबुक्यांनी मारहाण केली, तसेच एका आरोपीने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून दुखापत केली.
या घटनेबाबत अलिबाग पोलिसांनी गु.र.नं. 215/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, त्याच वेळी आणि ठिकाणीच दुसऱ्या गटाने देखील परस्पर तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मित्राने समुद्र किनारी चणाभेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यामुळे एका गटाने संगनमत करून हल्ला केला, त्यात आरोपीने सुरीचा वापर करताना फिर्यादीच्या हाताला दुखापत केली, तसेच इतर आरोपींनी हाताबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली.
या संदर्भात दुसरा गुन्हा गु.र.नं. 216/2025 दाखल करण्यात आला असून आरोपींवर कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस हवालदार श्री. वरसोलकर हे करीत आहेत. या एकाच घटनेतून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने अलिबाग पोलिसांकडून दोन्ही बाजूंचा सखोल तपास सुरू आहे.