Camphor factory wastewater damage : कापूर उत्पादक कंपनीतील सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
खोपोली ः प्रशांत गोपाळे
कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम ऑरगॅनिक्स कंपनीच्या मागच्या बाजूला शेतकरी सुर्यकांत गायकवाड यांची शेती आहे. त्यांच्या शेतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कंपनीचे प्रदूषित सांडपाणी राजरोसपणे सोडल्यामुळे शेतात काळ्या पाण्याचे डबके झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक वर्षापासून कंपनी व्यवस्थापन आरेरावी करीत आहे. या विरोधात भीम शक्ती संघटनेचे बैठा सत्याग्रह आंदोलन संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी तहसिल कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन गुरूवार 6 नोव्हेंबर रोजी केले होते.
खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलनाची दखल घेवून प्रदुषण मंडळ आणि कृषी विभागाला नुकसानीची पाहाणी करण्यासाठी पत्र दिले होते.प्रदुषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे यांनी शेतीची पाहणी करून शेतामधील केमिकल्सयुक्त काळे पाणी तपासणीसाठी घेवून गेले आहे.
गेल्या 25 वर्षापासून कंपनीचा प्रदुषित सांडपाणी शेतात सोडल्यामुळे शेती नापीक झाली आहे.प्रदुषण मंडळाकडे अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली जात नसून कंपनी मालक हे पाणी कंपनीतील नसून गावच्या नाल्याचे असल्याचे सांगून जबाबदारी टाळत आहे.परंतु शेतीचे नुकसान करणाऱ्या मंगलम कंपनीवर कारवाई केली नाहीतर शेताच आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाधित शेतकरी सुर्यकांत गायकवाड यांनी दिल्यावर आता शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
सुर्यकांत गायकवाड यांच्या शेताची पाहणी करून दुषीत पाणी नमुने तपसणीसाठी घेतले आहेत.कंपनीची पहाणी करून अहवाल वरीष्ठांकडे पाठवणार असल्याची माहिती प्रदुषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी शिवानंद बसवडे दिली आहे.

