नेरळ : आनंद सकपाळ
कर्जतहून मुंबई आणि मुंबई ते कर्जत दिशेने धावणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या ‘लेटमार्क’वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धडाकेबाज योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले तब्बल 10 रेल्वे फाटकं कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या जागी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
या कामाला डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, या निर्णयामुळे लोकल ट्रेनचा वेळेवरपणा मोठ्या प्रमाणात सुधारेल, तसेच स्थानिक नागरिकांची होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कल्याण ते कर्जतदरम्यान दररोज हजारो प्रवासी हे लोकलने प्रवास करतात. मात्र रेल्वे मार्गावरील असलेल्या क्रॉसिंग फाटक हे वारंवार उघड-बंद होत असल्याने लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग हा मंदावतो.
एक रेल्वे फाटक उघडून पुन्हा बंद होण्यासाठी साधारण 3 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो, त्यातच फाटक हा बंद होण्याचे वेळी रस्त्यावरील वाहने ही वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी घाई गडबडीत वाहन वेगाने नेत असल्याने फाटकाला धडक देण्याचे प्रकार ही घडत असल्याने, ही याचा लोकल सेवेवर परिणाम होत आहे.
त्यामुळे ही रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण - कर्जत दरम्यान असलेले 10 रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय जाहिर केला असल्यामुळे आता रेल्वे फाटका समोर गाड्यांना थांबवाविण्याचा प्रश्न मिटणार असल्याने, फाटका समोर थांबणाऱ्या वाहनासह लोकल व एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासाचा वेळ हा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. परिणामी लोकल ट्रेन ‘सुसाट’ धावणार असून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत हाणार आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, उपनगरीय मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून तब्बल 40 ते 45 वेळा उघडली-बंद केली जातात. याचा थेट परिणाम लोकलच्या वक्तशीरपणावर होत आहे. मध्य रेल्वेच्या एकूण 894 लोकलपैकी तब्बल 70 ते 75 टक्के लोकल या फाटकांमुळे थांबतात किंवा मंदावतात. आता उड्डाणपूल तयार झाल्यानंतर लोकल ट्रेन वेळेवर धावतील अशी अपेक्षा व्यक्त करत, स्थानकबंद होणाऱ्या एलसी फाटकांची संख्या वांगणी4, नेरळ1, भिवपुरी3, कर्जत2 असे एकूण 10 रेल्वे फाटकांचा समावेश असल्याची माहिती ही देण्यात आली आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण-कर्जत दरम्यान लोकल प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, उशिर टळेल आणि लोकलचा वेग वाढेल. प्रवासी संघटनांनीही मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. फाटकं बंद झाल्याने आमचा प्रवास वेळेवर होईल, आता लेटमार्क लोकल भूतकाळात जाणार, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे वांगणी, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत परिसरातील गावांना प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा फायदा होणार आहे. विशेषतः वांगणी आणि नेरळ भिवपुरी परिसरातील फाटकं वारंवार उघडल्यामुळे लोकल ट्रेन वारंवार थांबत असत, आता ती समस्या संपणार आहे त्याच बरोबर येथील वाढलेली लोकसंख्या त्यातून वाढलेली वाहनांख्या यामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी ही कायमची संपुष्टात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून, डिसेंबर महिन्यापासून उड्डाणपुलांच्या बांधकामाला सुरुवात होईल.