

महाड ः श्रीकृष्ण बाळ
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका निमित्ताने रायगड जिल्ह्यात काल घोषित झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील असे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत.
मागील तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून शिवसेनेची संलग्न असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्ष वाढीच्या धोरणाचा अवलंब करत आगामी निवडणुकांमध्ये आपला साथीदार बदलत राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्याचा घेतलेला निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांना देखील पसंत पडल्याचे चित्र महाड मधील या पक्ष कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चेमधून दिसून आले आहे. मागील काही निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवताना भारतीय जनता पक्षाला नगरपालिका व ग्रामपंचायत मध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यात अपयश आले होते.
राज्यात असलेल्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पक्ष हे तीन प्रमुख पक्ष शासनामध्ये कार्यरत असताना रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता शिवसेनेला या युतीमध्ये एकला चालवण्याचे धोरण घेण्यास भाग पाडणारा ठरला आहे.
सन 90 च्या दशकानंतर महाडनगर परिषदेमध्ये अपवादात्मक स्थिती मध्येच भारतीय जनता पक्षाने आपले खाते उघडल्याचे केलेल्या या संदर्भातील पाहणी मध्ये दिसून आले आहे. सत्यवान महाडिक 2000 पूर्वी तर त्यानंतर सौ स्नेहा सुधीर महाडिक यांनी रोहिदास नगर प्रभागातून या पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. महाड नगरीच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना संत रोहिदास नगर चवदार तळे काकर तळे या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाची असलेली ताकद लक्षणीय आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शहराच्या अन्य भागात युतीच्या उमेदवारांना झालेल्या मतांच्या आकडेवारी मध्ये चवदार तळे का कर तळे प्रभागात अधिक मतदान युतीला झाल्याचे आकडेवारी सिद्ध झाले आहे.
भारतीय जनता पक्षाकरता ही नवीन युतीची वाटचाल भवितव्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास महाडमधील राजकीय जाणकार व्यक्त करीत असून शहराबरोबरच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील याचे दृश्य परिणाम अनुभवास येतील असे बोलले जात आहे.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रायगड जिल्हा संदर्भातील केलेला वक्तव्यांवरून या दोन पक्षांकडे अन्य पक्षांच्या तुलनेत अधिक राजकीय ताकद निर्माण होऊन जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होतील असे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. एकूणच ही युती जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या असलेल्या स्वतंत्र ताकदीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने या निवडणुकांमध्ये होणारे निकाल या पक्षाकरता राजकीय दृष्ट्या सक्षम करणारे ठरतील असा दावा केला जात आहे.
जिल्ह्यात झालेल्या या नाट्यपूर्ण घडामोडीने सर्व राजकीय पक्षांना आपली समीकरणे बदलण्यास भाग पाडल्याने ही युती आगामी काळात कशा पद्धतीने साम-दाम दंड भेदाचा वापर करून निवडणुकांना सामोरे जाते याकडे तमाम रायगडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.नगरपालिका निवडणूक निकालानंतरच ही युती कुणाला फायद्याची ठरली हे दिसून येणार असल्यो सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सर्व निवडणुका एकत्र लढणार
यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाची झालेली युती ही महायुतीमधीलच घटक पक्षांची असल्याने आगामी काळात येणाऱ्या निवडणुका संयुक्तपणे लढविण्याचा काल केलेला घोषित कार्यक्रम पाहता जिल्ह्यातील या विविध स्तरावरील होणाऱ्या निवडणुकांमधील राजकीय समीकरणे बदलतील असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.