कर्जत : खोपोलीतील मंगेश काळोखे हत्येची घटना अतिशय निंदनीय आहे. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असून. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. काळोखे कुटुंबाच्या दु:खात शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही सर्वच सहभागी आहोत. प्रकरणात राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे राजकीय विरोधक आहेत. काळोखे हत्या प्रकरण शीघ्रगती न्यायलयात चालवले जावे आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी आमची भावना असल्याचे देखील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत म्हणाले.
नितीन सावंत यांनी कर्जत येथील शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे सावंत म्हणाले.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, या हत्या प्रकरणानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी माध्यमांसमोर बाईट दिली नाही. कारण ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. पोलिसांनी आम्हाला विनंती केली. सोशल मीडियावर किंवा इतर कुठे व्यक्त होऊ नका, संयम बाळगा त्यानुसार आम्ही कुठे व्यक्त झालो नाही. पण काल परवापासून ज्यांना दु:ख बाजूला ठेवून राजकारण करायचं आहे. त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरु केलं आहे. अशी टीका यावेळी सावंत यांनी आमदार थोरवे यांच्यावर केली.
नितीन सावंत म्हणाले, आज जी घटना घडली त्यात राजकारण झालं नाही पाहिजे हे मनापासून वाटत होतं. पण आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे, 2009 पासून प्रत्येक वेळी कुठल्या गावात घटना झाली की त्यात महेंद्र थोरवे यांनी नाहक त्यांच्या विरोधकांचे नाव गोवले. शिवसैनिकांवर वेगवेगळ्या केसेसमध्ये खोटे गुन्हे दाखल केले.
तालुक्यात चुकीच्या घटनात राजकारण करायचे काम विरोधकांना गुंतविण्याचे काम करणऱ्या वृत्तीला ठेचण्याचे काम करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात मागील 10 ते 15 वर्षे याच पद्धतीने ते काम करत आहेत, असा आरोप देखील यावेळी सावंत यांनी केला.
आरोपींना शिक्षा व्हावी ही तटकरे यांची भूमिका
यावेळी बोलताना नितीन सावंत म्हणाले की, जे खरे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा व्हावी, ही खासदार सुनील तटकरे यांची भूमिका आहे, आणि आमची देखील तीच भूमिका आहे. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. पोलिस प्रशासन काम करत आहे, सत्य हे सत्यच असते, ते समोर येणार आहे. पण एखाद्या घटनेचे किती राजकारण करावे ते प्रत्येकाला समजले पाहिजे, असे सावंत यांनी सुचित केले.
पोलिस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालो नाही. पण ते जे करत आहेत. मात्र आमची सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, हे थांबवले नाही तर पोलिस प्रशासना विरोधात 5 हजार लोकांचा मोर्चा आम्हाला काढावा लागेल.नितीन सावंत, शिवसेना नेते