खांदा कॉलनी : जेएनपीटी महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कलंबोली सर्कलजवळ मुंब्राच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी कंटेनरवर वाहून नेण्यात येत असलेली शंभर टनांहून अधिक वजनाची भलीमोठी लोखंडी प्लेट निसटून अर्धी रस्त्यावर आली. त्यामुळे कंटेनरही एका बाजूला झुकून पलटी होण्याच्या स्थितीत आला होता.
कलंबोली वाहतूक पोलीस ठाण्याच्या अगदी बाजूलाच हा प्रकार घडला. महामार्गावर लोखंडी प्लेट निसटल्याने वाहतुकीचा मार्ग अडवला गेला. परिणामी, कलंबोली सर्कलसह आजूबाजूच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळच्या कामावर जाण्याच्या वेळेतच ही घटना घडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच कलंबोली वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, लोखंडी प्लेटचे प्रचंड वजन आणि कंटेनरची धोकादायक स्थिती यामुळे वाहतूक व्यवस्थापन करताना अडचणी निर्माण झाल्या.
या प्रकरणी कंटेनर चालक आणि वाहनमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अवजड साहित्याची वाहतूक करताना योग्य सुरक्षितता, बांधणी आणि नियमांचे पालन केले जाते का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.