JNPA container traffic pudhari photo
रायगड

JNPA container traffic : जेएनपीए परिसरात प्रचंड वाहतूककोंडी

कंटेनरमुळे संपूर्ण वाहतूक कोलमडली, व्यापारीवर्गाला प्रचंड फटका

पुढारी वृत्तसेवा

उरण : जेएनपीए पोर्ट टर्मिनल आणि कंटेनर फ्रेट स्टेशन दरम्यान चालणाऱ्या एक्झिम कंटेनरच्या वाहतुकीत गेल्या चार दिवसांपासून मोठी विस्कळीतपणा निर्माण झाली असून तीव्र वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेली ही वाहतूककोंडी दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली असून संपूर्ण जेएनपीए पोर्ट परिसराला याचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर 'कंटेनर फ्रेट स्टेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया' ने परिपत्रक काढून (ट्रेड ॲडव्हायझरी) आयात-निर्यात क्षेत्रातील सर्व घटकांना परिस्थितीची पूर्वकल्पना दिली आहे.

गेल्या ३ ते ४ दिवसांत 'एनएसआयसीटी' टर्मिनल परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रभाव इतर टर्मिनल्स आणि जोड रस्त्यांवरही पडला आहे. त्यामुळे ट्रेलर्सना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असून टर्नअराउंड वेळेत अभूतपूर्व वाढ झाली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने इतर टर्मिनल्सकडे जाणाऱ्या वाहनांचीही कोंडी झाली असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, सर्व सदस्य सीएफएस उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करून कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोहोच रस्त्यांवर लागलेली प्रचंड वाहतूक कोंडी ही सीएफएसच्या नियंत्रणाबाहेरची आहे. त्यामुळे होणारा विलंब हा प्रत्यक्ष रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे असून तो सीएफएसच्या कामकाजातील त्रुटींमुळे नाही, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबासाठी आणि त्याच्या परिणामांसाठी सदस्य सीएफएस जबाबदार राहणार नाहीत, असेही 'सीएफएसएआय'चे सरचिटणीस यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

जेएनपीएअंतर्गत बंदरांतील कामकाज पूर्वपदावर येत असले तरी एनएसआयसीटी बंदरात मालवाहू जहाजांची संख्या वाढली आहे. होर्मुझ खाडीतील परिस्थितीमुळे काही जहाजांना आफ्रिकेला वळसा घालावा लागत असल्याने वाहतुकीस अधिक वेळ लागत आहे. परिणामी जहाजांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. एनएसआयसीटीचे सातपैकी पाच गेट सध्या बंद असल्याने कंटेनर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येत्या दोन-चार दिवसांत कामकाज सुरळीत होईल.
गिरीश थॉमस, मुख्य वरिष्ठ अधिकारी, कंटेनर वाहतूक विभाग, जेएनपीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT