नाते (जि. रायगड) : इलियास ढोकले
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाचाड येथील राजवाड्याला आता गतवैभव प्राप्त होणार आहे. मुंबईच्या पुरातत्व सर्वेक्षण मंडळाच्या वतीने राजवाड्याच्या संवर्धनाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून सरपंच, माजी सरपंच राजेंद्र खातू यांनी प्रयत्न केले आहेत.
पाचाड येथील राजवाडा, तसेच परिसरातील संवर्धनांतर्गत मंजूर कामांमध्ये तटबंदीवर वाढलेल्या गवताचे मुळापासून निर्मूलन करणे, तटबंदीवर पुन्हा गवत वाढू नये याकरिता पारंपरिक चुना-वाळूमिश्रित जलविरोधी आलेपन करणे, काही जागी नाहीसे झालेले विशिष्ट आकाराचे प्रस्तर, दगड प्राप्त पुराव्यांनुसार बनवून बसवणे. जलस्रोताचे संवर्धन आणि पुनर्स्थापन करणे.
मुख्य प्रवेशद्वार ते जिजाऊ निवासस्थान यादरम्यान दगडी रस्ता उपलब्ध करणे, रिकाम्या जागेत परिस्थितीनुरूप मान्य नैसर्गिक संपदेनुसार भूदृश्य उद्यान करणे, ठिकठिकाणी ऐतिहासिक स्थळाविषयी थोडक्यात माहिती फलक बसवणे, दृकश्राव्य माहिती उपलब्ध करणे, शिवभक्त पर्यटकांसाठी जलपेय सुविधा उपलब्ध करून देणे आधी बाबींचा समावेश आहे.
यासंदर्भात केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे महाड-रायगडचे प्रकल्पप्रमुख दिवेकर यांनी या संवर्धनाच्या कामाला मंजुरी मिळाल्याच्या माहितीला दुजोरा दिला असून, ही कामे तातडीने हाती घेण्यातून पूर्ण केली जातील, असे सांगितले. सोमवारी (दि. 12) 427 वा जन्मोत्सव सोहळा पाचाड येथे संपन्न होणार आहे.
नाते : पाचाड येथील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याचे आता संवर्धन केले जाणार आहे.