नवसाला पावणारी पनवेलची ग्रामदैवत जाखमाता देवी pudhari photo
रायगड

Jakhmata Devi Temple Panvel : नवसाला पावणारी पनवेलची ग्रामदैवत जाखमाता देवी

पनवेलसह नवी मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान; नवस फेडण्यासाठी भाविकांची लागते रीघ

पुढारी वृत्तसेवा

कळंबोली : दीपक घोसाळकर

पनवेलचे जागृत देवस्थान व दुष्टांपासून रक्षण करणारी जाखमाता देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात गेल्या अनेक वर्षापासून साजरा केला जात आहे. या देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासीयांची आहे.

सन 1942 ते 47 च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. यावेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. परंतु पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती असे भक्त देवीच्या मंदिर परिसरात देवीच्या कृपाछत्राखाली अधिवास करुन राहिले. त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परिणाम झाला नाही.

या दृष्टांतापासून जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजूबाजूच्या गावातून पोहचले. तेव्हापासून पनवेलचे जागृत देवस्थान व पनवेलकरांचे दुष्टांपासून रक्षण करणारी जाखमाता देवी ही भक्तांची माता म्हणून हदयस्थानी अढळ झाली.

या देवीचे पुजारी भोपी व जाखमाता मंदिराचे व्यवस्थापक देवीची पूजाअर्चा व देवीच्या मंदिराची सर्व व्यवस्था पाहतात. त्यांचेकडून देवीबाबत भक्तांची असणारी श्रध्दा त्यांनी विशद केली. प्लेगच्या साथीपासून पनवेलकरांचे देवीचे रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रध्दा पनवेलवासियांची झाल्याने त्यांनी देवीची पालखीतून मिरवणुक काढली. त्या दिवसापासून देवीची दरवर्षी चैत्र महिन्यात पालखीचा सोहळा केला जातो.

या सोहळयात पनवेलसह आजूबाजूच्या गावातील देवीचे भक्त सहभागी होतात. सदरचा पालखी सोहळा हा रात्री 9 वाजल्यापासून सुरू केला जातो. तो संपूर्ण पनवेलमधून फिरुन पहाटेपर्यत देवळात आणण्याची प्रथा गेल्या नऊ ते दहा दशकांपासून सुरू आहे. यावेळी देहभान विसरुन भाविक पालखीच्या मिरवणुकीत भजन आरत्या व देवीचा जयजयकार करीत असतात. परंतु 21 व्या शतकात कायद्याचे बंधन या पालखी सोहळयाला लागल्याने पालखी वेळेच्या बंधनात फिरवली जात आहे. नवविवाहीत दाम्पत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याचा प्रथा आहे.

या देवीचे चैत्र महीन्यात निघणारी पालखी सोहळा व आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उत्सव दरवर्षी मोठया श्रध्देने व जल्लोषात साजरे केले जात आहेत. तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीची सामुदायीक आरती केली जात असते. जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी यांच्याकडून त्यांनी आपल्या भोपी परिवार यांना सांगून ठेवल्या आहेत. त्यामध्ये देवीचे वाहन हे वाघ होते व देवी वाघावर बसून तेव्हाचे पनवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातून फेरफटका मारुन गावाचे रक्षण करीत असे.

या देवीच्या पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार केला गेला आहे. नवरात्री उत्सवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पनवेलसह नव्या मुंबईतील हजारो भक्तगण या नवरात्र उत्सवात आपले नवस फेडण्यासाठी व आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीचे दर्शन घेऊन ओटी भरण्यासाठी एकच गर्दी होते.

  • नवरात्र उत्सवात नवस फेडण्यासाठी पनवेलच्या पंचक्रोशीतील भाविकांची मोठया संख्येने गर्दी होत असते. देवीला साडीचोळी नेसविणारे व ओटी भरणारे भाविक मोठया प्रमाणावर असल्याचे मंदिराचे पुजारी भोपी सांगतात. देवीच्या नवसात विविधता आढळुन येत आहे. यामध्ये काही भक्त देवीला पाळण्याचा नवस बोलतात तर काही भक्त जन्मलेल्या मुलाचे व्यंग बरे होण्यासाठी साकडे घालुन आपल्या आर्थिक कुवतीनुसार चांदी, तांबे किंवा लाकडी अवयवयांच्या प्रतिकृती देविला अर्पण करुन आपले नवस फेडतात. गावात जन्माला आलेले बाळ प्रथम देवीच्या पायावर ठेवल्याशिवाय गावाबाहेर न्यायचे नाही असा प्रथा अजुनही पनवेल गावात परंपरेने चालत आलेला पाहावयास मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT