कोकणी फणसाच्या बियांना सोन्याचे दिवस pudhari photo
रायगड

Jackfruit Seeds : कोकणी फणसाच्या बियांना सोन्याचे दिवस

२०० रुपये किलोने विक्री; फणस पीक शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा स्रोत

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

कोकणासह पश्चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळणारा फणस हा आता केवळ स्वादिष्ट फळ म्हणूनच मर्यादित राहिलेला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक अत्यंत विश्वासार्ह आणि मजबूत स्रोत म्हणून पुढे येत आहे. एकेकाळी फणस खाल्ल्यानंतर निरुपयोगी समजून टाकून दिल्या जाणाऱ्या फणसाच्या बियांना (आठळ्यांना) आता बाजारपेठेत सोन्याचे दिवस आले आहेत. पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या या बिया सध्या बाजारात चक्क १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत.

भारतातील उष्ण आणि दमट हवामानात उत्तम प्रकारे वाढणारा फणस हा देशातील सर्वात मोठ्या फळांपैकी एक मानला जातो. कोकण, केरळ, कर्नाटक, गोवा आणि पश्चिम घाट परिसरात याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. कमी देखभाल, अत्यंत कमी उत्पादन खर्च आणि दीर्घकाळ उत्पादन देण्याची क्षमता ही या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. एकदा लागवड केल्यानंतर अनेक दशकं हे झाड फळे देत राहत असल्याने, दीर्घकालीन आर्थिक सुबत्तेसाठी आता अनेक शेतकरी फणसाच्या बागांकडे वळू लागले आहेत.

आरोग्यदायी गरे

फणसाचे गरे अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. त्यामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. कच्च्या फणसाची भाजी, लोणचे, चिप्स आणि कटलेट यांसारखे पदार्थ तर लोकप्रिय आहेतच, शिवाय सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या फणसाला 'शाकाहारी मांस' म्हणून मोठी मागणी निर्माण झाली आहे. यामुळे देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत फणसाची पत कमालीची वाढली आहे.

रोजगाराला बळ

ग्रामीण भागातील महिला बचतगट, स्वयंरोजगार गट आणि लघुउद्योजकांनी फणस प्रक्रिया उद्योगात मोठी भरारी घेतली आहे. फणसाचे गरे, चिप्स, लोणचे, जॅम, पल्प आणि बियांचे विविध पदार्थ तयार करून त्यांची यशस्वी विक्री केली जात आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.

फणसाचे फळ, बिया, पाने आणि त्याचे लाकूड हे सर्वच उपयुक्त असल्याने अनेक भागांत फणसाला ‘कल्पवृक्षासमान फळझाड’ म्हटले जाते. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि वाढत्या प्रक्रिया उद्योगांमुळे फणसाचे आर्थिक महत्त्व सातत्याने वाढत आहे. फळाचे गरे आणि बिया या दोन्हींपासून भरघोस उत्पन्न मिळत असल्याने, "फळाचेही मोल आणि बियांचेही मूल्य" जपत फणस शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दुहेरी लाभ देणारा 'कृषी संपत्तीचा स्रोत' ठरत आहे.

बियांचे पीठ ठरतेय 'सुपरफूड'

फणसाच्या बियांमध्ये प्रथिने, लोह, पोटॅशियम, झिंक आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. सध्या या बियांवर प्रक्रिया करून त्यांचे पीठ तयार केले जात आहे. बिस्किटे, केक, पापड, चकल्या आणि कुकीज यांसारख्या मूल्यवर्धित खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर वाढला आहे. बाजारात 'ग्लुटेनमुक्त' अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने फणसाच्या बियांच्या पिठाला मोठी व्यावसायिक संधी निर्माण झाली असून शेतकरी आणि उद्योजकांसाठी नवे दरवाजे उघडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT