खोपोली ः खोपोली नगरपालिका थेट नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दत्ताजीराव मसुरकर,डॉ.सुनिल पाटील,अश्विनी पाटील आणि मंगेश दळवी यांच्या नावाची चर्चा आहे . दळवी यांची उमेदवारी निश्चित झाली तर शिवसेना शिंदे गटातील काही मातब्बर नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तशी एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा सुरू असून हे शिंदे गटाचे नेते कोण याचा शोध सुरू झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी समोर आली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनाचा नेत्यांना विसर पडला असल्याची चर्चा दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
खोपोली शहराचे राजकारण अत्यंत चुरशीचे झाले असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहे. दोन्हीही पक्षात इनकमिंग, आऊटगोईंग सुरु झाले आहे.शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे विळ्या भोपळ्याचे वैर असले तरी मंगेश दळवी यांचे शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्याची चर्चा आहे. दळवी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली तर शिंदे गटातील काही मातब्बर नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खोपोली शहराचे राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम ठरणार आहे. शिंदे गटातील कोणते बडे नेते मंगेश दळवींसाठी पक्ष प्रवेश करणार आहेत याची चर्चा शहरातील नाक्या नाक्यावर सुरू आहे. ही चर्चा खरी आहे की खोटी येणारा काळ ठरवेल.मात्र खोपोली शहरात कार्यकर्त्यांमधील अंतर्गत नाराजी निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येणार असे चित्र सध्या खोपोली शहरात आहे.
भाजपचा नगराध्यक्षपदाचा दावा
मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने थेट नगराध्यक्षपदाची जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले होते तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार होते. त्यामुळे महायुतीमधून भाजपला नगराध्यक्षपदाची जागा सोडावी अशी मागणी खोपोली भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. ही मागणी किती प्रभावी ठरेल की समजोता करून घेतील याकडे ही खोपोली शहरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे शिंदे गटाचे मोठे टेन्शन वाढले आहे . त्यामुळे आगामी नगरपालिकेची निवडणूक मोठी रंगतदार होणार असे चित्र आहे.