पोलादपूर शिक्षण विभागाच्या कारभाराची होणार चौकशी pudhari photo
रायगड

Poladpur education department : पोलादपूर शिक्षण विभागाच्या कारभाराची होणार चौकशी

मनसे विद्यार्थी सेनेच्या उपोषणानंतर जिल्हा परिषद प्रशासनाची दखल; अखेर उपोषण स्थगित

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील मनमानी व कथित भ्रष्ट कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार सुधीर मोहिरे यांनी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी सायंकाळी यशस्वी ठरले. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत 20 दिवसांच्या आत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून पोलादपूर पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आमरण उपोषण सुरू होते. शिक्षण विभागाकडे वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही कोणताही प्रश्न मार्गी न लागल्याने मनसे विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ओंकार मोहिरे यांची प्रकृती खालावत असतानाही प्रशासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मनसेचे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर व सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.

यावेळी बोलताना मनसे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर म्हणाले, ‌‘हा विजय पोलादपूरमधील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांचा आहे. आम्ही केवळ आश्वासनावर थांबणार नाही. 20 दिवसांत होणाऱ्या चौकशीवर आमचे बारीक लक्ष असेल. जर प्रशासनाने कारवाईत दिरंगाई केली, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.‌’

यावेळी अलिबाग येथील प्राथमिक शिक्षण कक्ष अधिकारी संजय कवितके, मनसे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर, शहर अध्यक्ष अनिल खेडेकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक ठोंबरे, मनविसे महाड तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, पोलादपूर तालुका संपर्क अध्यक्ष सुरज कदम, शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, मनसे शहर उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर, उपाध्यक्ष प्रफुल पांडे, मनविसे महाड सचिव मयूर जाधव, मनविसे पोलादपूर तालुका सचिव ओंकार उतेकर, महेश दरेकर, प्रशांत नटे, आदित्य गायकवाड, विकास भिलारे, निखिल उतेकर, हर्ष शेठ यांच्यासह मनसेमनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

त्रिस्तरीय चौकशी समितीची घोषणा

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती देणारे अधिकृत पत्र रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण कक्ष अधिकारी संजय कवितके यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून दिले. या पत्रानुसार येत्या 20 दिवसांत पोलादपूर शिक्षण विभागाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, अहवाल प्राप्त होताच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT