

अलिबागः अलिबाग शहरासह अनेक तालुक्यातील कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नाही त्यामुळे गोळा केलेला कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतीला वनविभागाने कांदळवन क्षेत्रात कचरा टाकण्यास हरकत घेतली आहे. कांदळवन क्षेत्रात कचरा टाकण्यास मनाई केली आहे. मात्र आधी पर्यायी जागा द्या आणि मग कारवाई करा अशी मागणी माजी आमदार सुभाष पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली.
यासंदर्भात गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. आणि या प्रश्नाकडे तातडीने लक्ष्य देण्याची विनंती केली. डम्पिंग ग्राउंड साठी आधी पर्यायी जागा द्यावी, त्यानंतरच कचरा टाकण बंद होऊ शकेल असे त्यांनी सांगीतले. यावर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ग्रामपंचायतला लवकरच पर्यायी जागा देण्याची हमी यावेळी दिली.
अलिबाग नगरपालिकेसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कचरा डम्पिंग ग्राउंड नसल्याने कांदळवन लगत असलेल्या क्षेत्रात टाकला जातो. या जागा पूर्वीपासून महसूल विभागाच्या अखत्यारीत होत्या. या ठिकाणी कांदळवनेही नव्हती. पण खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे आज तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी कांदळवने तयार झाली आहेत. आणि या जमिनी आता संरक्षित वन म्हणून घोषित झाल्या आहेत. त्यामुळे आधी डंपिंग ग्रांऊडसाठी पर्यायी जागा द्या अशी मागणी माजी आमदार पाटील यांनी केली.
11 हजारहेक्टर कांदळवनक्षेत्र वर्ग
रायगड जिल्ह्यात जवळपास 11 हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने कांदळवन विभागाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे कांदळवन विभागाने या परिसरात कचरा टाकण्यास हरकत घेतली आहे . वनविभागाच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक ग्रामपंचायतींची तसेच नगरपालिकेची मोठी अडचण झाली आहे. जमा होणारा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने बघीतले जायला हवे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.