पोसरीत अपक्ष उमेदवारावर हल्ला pudhari photo
रायगड

Raigad Crime : पोसरीत अपक्ष उमेदवारावर हल्ला

कर्जत तालुक्यात हिंसाचाराची मालिका सुरूच

पुढारी वृत्तसेवा

कर्जत ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यासह संपूर्ण परिसरात हिंसाचाराचे सावट गडद होत चालले आहे. खोपोली व नेरळनंतर आता कर्जत तालुक्यात थेट उमेदवारावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडावं जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी लढवत असलेले भगवान हिरु मुने यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी स भगवान मुने हे कडावं जिल्हा परिषद गटातील पोसरी गावात घरोघरी जाऊन प्रचार करत असताना, तोंड झाकून आलेल्या एका अज्ञात इसमाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सदर आरोपीने भगवान मुने यांना हाताबुक्याने मारहाण केली असून, घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात भगवान मुने यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, मोठा अनर्थ टळला आहे.

भगवान हिरु मुने हे पिंपलोली गावातील सुशिक्षित तरुण व सामाजिक कार्यकर्ते असून, जनतेचे प्रश्न आणि समस्या ते सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. समाजासाठी काहीतरी विधायक काम घडावे, या हेतूने त्यांनी राजकारणात प्रवेश करत कडावं जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

हल्ल्यानंतर भगवान मुने यांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली आहे. तोंड झाकून आलेल्या हल्लेखोराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार राजकीय हेतूनेच घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उमेदवारावर थेट हल्ला झाल्याने कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या चाकूहल्ल्याने वातावरण आधीच तापलेले असताना, अवघ्या दुसऱ्याच दिवशी दि. 30 जानेवारी रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत उमेदवारावर हल्ला झाल्याने, खोपोलीनेरळकर्जत असा हिंसाचाराचा धोकादायक क्रम उघड झाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT