इब्सार कॉलेजला टाळे Pudhari
रायगड

Karjat Municipal Corporation: मालमत्ता कर थकविले; महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे

कर्जत नगरपालिकेची कारवाई; इब्सार कॉलेजने थकविला 60 लाखांचा कर

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

कर्जत नगरपरिषदेच्या कर विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मोठी कार्यवाही करत कर्जत दहिवली येथील इब्सार ग्रुप ऑफ कॉलेजच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार सीलबंद केले आहे. कॉलेजच्या गेटवर नोटीस लावून टाळे ठोकण्यात आले असून, संपूर्ण परिसर नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ही सुत्रांकडून मिळाली आहे.

कर्जत नगर परिषद कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इब्सार कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुमारे तीन ते चार विभागांच्या मालमत्ता येतात. या सर्व मालमत्तांवर मिळून सुमारे 60 लाख रुपयांची कर थकबाकी ही कर्जत नगर परिषदेची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एप्रिल सन 2025 ते मार्च सन 2026 या कालावधीतील मालमत्ता कर व इतर कर मिळून 41 लाख 53 हजार 16 रुपये इतकी कर थकबाकी असल्याचे नगरपरिषदेच्या कर विभागाकडून सांगितले आहे.

संबंधित संस्थेला थकबाकी भरण्यासाठी अनेक वेळा बिले व नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच यापूर्वी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही रक्कम न भरल्यामुळे कर्जत नगरपरिषद प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलत कार्यवाही केली आहे.

13 मार्च 2026 रोजी कर्जत नगरपरिषदेच्या कर विभागाने कर्जत दहिवली येथे जाऊन पंचनामा करत कॉलेजच्या मुख्य गेटवर नोटीस लावली आणि गेटला टाळे ठोकून संपूर्ण परिसर सीलबंद केला आहे.

सदर कार्यवाही ही महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 152 व 153 अंतर्गत करण्यात आली आहे. या कलमानुसार थकित कर वसुलीसाठी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार नगरपरिषदेला आहे. झोन क्र. 02 चे प्रमुख कर निरीक्षक शशांक शांताराम तळवटकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 13 मार्च 2026 रोजी पंचांसमक्ष जप्तीचा पंचनामा करण्यात आला आहे. या पंचनाम्यासाठी रमाकांत पुंडलिक दगडे आणि रितेश हरिश्चंद्र मिसाळ हे पंच म्हणून उपस्थित होते. तसेच बजावणी अधिकारी शशांक शांताराम तळवटकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली आहे.

कर्जत नगरपरिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित संस्थेने कर थकबाकीची रक्कम तातडीने न भरल्यास पुढील टप्प्यात संस्थेची जंगम मालमत्ता जप्त करण्यासह इतर कठोर कार्यवाही ही केली जाऊ शकते.

दरम्यान, कॉलेज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, या कार्यवाहीमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इब्सार कॉलेज संस्थेला यापूर्वी सात दिवसांची मुदत देऊन नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ती मुदत संपल्यानंतरही संस्थेला पुन्हा 24 तासांची अतिरिक्त मुदत देण्यात आली. मात्र या कालावधीतही संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे अखेरीस कर्जत नगरपरिषदेतर्फे कायदेशीर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
शशांक शांताराम तळवटकर, प्रमुख कर निरीक्षक कर्जत नगरपरिषद
नगरपरिषदेकडे असलेली थकबाकी हा आमच्या संस्थेचा अंतर्गत प्रशासकीय प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही आणि नगरपरिषद परस्पर चर्चेतून सोडवू. संस्थेला देखील विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पूर्ण काळजी आहे. नगरपरिषदेचा थकीत कर भरण्याबाबत आमची तयारी आहे. मात्र, नगरपरिषदेकडून व्याजावर व्याज आकारण्यात आले आहे. आणि ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्यामुळे थकबाकी तातडीने भरता आली नाही.
मीनाक्षी गौर (मोंग), एक्झिक्युटीव डायरेक्टर, इब्सार कॉलेज, दहिवली-कर्जत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT