

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीने गॅसची टंचाई जाणवू लागल्याने त्याची मोठीझळ भारताला बसू लागली आहे.यामुळे आता ग्रामीण भागात गॅस तुटवड्याने आता तवा चुल्यावर म्हणण्याची वेळ आली आहे. तर शहरवासियांना इंडेक्सचा आधार घ्यावा लागत आहे.
सध्या गॅस टंचाई भेडसावत आहेत विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. गेल्या काही वर्षांपासून गॅसच्या वापरामुळे चुलींची मागणी जवळपास संपली होती. ग्रामीण भागातील घरात ओटयांवर गॅसच्या शेगड्या पहायला मिळतात. उज्ज्वला योजनेमुळे घरोघरी गॅस पोहोचल्याने स्वयंपाक घरातून चुली जवळपास गायब झाल्या आहेत. ग्रामीण भागात आज केवळ लग्नसमारंभ, घरभरणी अशा धार्मिक कार्यासाठी चुली नेल्या जातात. ही मागणीदेखील खूपच कमी आहे. त्यामुळे कुंभार समाजातील अनेकांनी हा पारंपरिक व्यवसाय सोडून इतर कामांकडे वळण्याचा मार्ग निवडला होता.
त्यामुळे चुली तयार करणाऱ्या कारागीरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सध्या युद्धाचे परिणाम गॅस पुरवठ्यावर होताना दिसत आहेत. गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे लोक पुन्हा चुलींचा पर्याय निवडताना दिसत आहेत. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येत असली तरी चुलींचा पुरवठा मात्र मर्यादित आहे. पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चुली तयार करणारे कारागिर आता कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणीच्या तुलनेत चुलींची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, चुली तयार करण्यासाठी लागणारी योग्य माती मिळणे ही देखील कुंभार समाजासाठी मोठी अडचण ठरत आहे.
मातीची उपलब्धता कमी झाल्याने उत्पादन वाढवताना कारागिरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. तरीही वाढत्या मागणीमुळे कुंभार समाजातील काही कारागिर पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळताना दिसत असून चुलींचा हा व्यवसाय पुन्हा एकदा नव्या उमेदीने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकेकाळी ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या चुली पुन्हा घराघरात दिसू लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हल्ली चुली फारसे कुणी बनवत नाहीत. आमच्या गावात चार-पाच जणीच हे काम करतात. परंतु आता गॅस टंचाईच्या भीतीने लोक चुलीकडे वळले आहेत. चूल बनवून सुकेपर्यंत वेळ लागतो; पण सध्या मागणी खूपच वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आम्ही त्या पुरवू शकत नाही.
शैला रातवडकर, व्यावसायिक