हेटवण्याच्या जलबोगद्याने विहिरीच आटल्या pudhari photo
रायगड

Hetawane dam water tunnel project : हेटवण्याच्या जलबोगद्याने विहिरीच आटल्या

बारा गावातील ग्रामस्थांचा दावा, प्रशासनाच्या टीबीएम प्रयोगाने भूगर्भातील जलस्त्रोत धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

मुंबई आणि नवी मुंबईसारखी महानगरे ज्या गतीने विस्तारत आहेत, त्यापटीत त्यांच्या गरजाही वाढत आहेत. मात्र, या शहरांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागातील, विशेषतः रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा जो बळी दिला जात आहे, त्याचे भीषण वास्तव आता समोर आले आहे.

नवी मुंबईला पाणी नेणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलबोगद्याच्या (वॉटर टनेल) कामामुळे पेण परिसरातील डोंगराळ भागातील नैसर्गिक जलस्त्रोत पूर्णपणे बाधीत झाले असून, ऐन उन्हाळ्यात आदिवासी बांधवांच्या विहिरी, बोअरवेल्स आणि तलाव चक्क कोरडे पडले असल्याने 11 गावे आणि 13 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठीच्या पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले असल्याची माहिती आदिवासी क्षेत्रातील कार्यकर्ते व निसर्ग अभ्यासक श्रीपाद लेले यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

काय आहे नेमकी समस्या?

नवी मुंबईची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी हेटवणे धरणातील पाणी जिते येथील जलप्रक्रिया केंद्रात नेण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे पाणी नेण्यासाठी जमिनीखाली 100 मीटर खोलवर जलबोगदा (वॉटर टनेल) खोदण्यात येत आहे. अफकॉन्स या कंपनीमार्फत टर्निंग बोअरिंग मशीन(टीबीएम ) या अत्याधुनीक व अजस्त्र मशीनच्या साहाय्याने हे जीते गांवा जवळ खोदकाम सुरू आहे. मात्र, हे मशीन बोगद्याचे खोदकाम करित असताना भूगर्भातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कापले गेले आहेत.

परिणामी, खोदकाम होत असलेल्या बोगद्याच्या वरिल व आजूबाजूच्या डोंगरातील नैसर्गिक स्त्रोतांचे पाणी या बोगद्यामध्ये वेगाने झिरपून येत आहे. परिणामी वरच्या भागातील गावे व वाड्यांमधील विहिरींतील पिण्याचे पाणी गायब झाले असल्याची माहिती बेलवडे बुद्रुक गावांतील आपली स्वतःची विहिर आटल्याने समस्याग्रस्त झालेले शेतकरी प्रकाश वाखरे यांनी दिली आहे. नैसर्गिक स्त्रोतच तोडण्यात आल्याने विहिराचा स्त्रोत पुन्हा कसा सुरु होणार आणि पिण्या बरोबर शेतीला पाणी कुठून आणणार अशी आम्हा शेतकऱ्यांची समस्या असल्याचे वाखरे यांनी सांगीतले.

पर्यावरण नियमांकडे दुर्लक्ष

एखादा कारखाना किंवा औद्योगिक प्रकल्प उभा करताना पर्यावरण विभागाची मंजूरी घेणे बंधनकारक असते. मग शहरांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमिनीची आणि डोंगररांगांची चाळण करणाऱ्या टनेल प्रकल्पांसाठी असे नियम लागू नाहीत का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाची ही हानी कोणाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न देखील श्रीपाद लेले यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांच्या शासनाकडील तातडीच्या मागण्या

1.रायगड जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या भागाचा दौरा करून वस्तुस्थितीची पाहणी करावी.

2. पाणी गायब झालेल्या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा अन्य मार्गाने त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा.

3.टनेलमुळे झालेले जलस्त्रोतांचे नुकसान भरून काढण्यासाठी तांत्रिक उपाययोजना कराव्यात.

कंत्राटदार कंपनीकडून तात्पुरता पाणी पुरवठा

मेघा इंजिनिअरिंग या कंपनीमार्फत टर्निंग बोअरिंग मशीनच्या साहाय्याने बोगदा खोदण्याचे काम सुरु असल्याने ,याच कपंनीने विहिरी आटलेल्या या सर्व गावांमध्ये टॅकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे तर आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे वॉटरजार दररोज देण्यात येत आहेत.तर काही वाड्यांवर बोअरवेल्स खोदण्यात येत असल्याची माहिती मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्ो व्यवस्थापन पाहणारे अविनाश म्हात्रे यांनी दिली आहे.

विहिरींचे पाणी गायब झालेली गावे-वाड्या

1.बेलवडे बुर्दुक, 2.माळवाडी, 3.बोरकसवाडी,4.राठीची वाडी, 5.माळेवाडी,6 मुंगोशी, 7.बेलवडे,8.ताडाचीवाडी,9.बोरकरवाडी, 10.बेंदिचीवाडी, 11.शबरिचीवाडी, 12.बोरी

विहिरींचे पाणी अचानक आटल्याचा प्रकार घडल्याचे तसेच पिण्याचे पाणी गांव-वाड्यांवर नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून आल्या आहेत. शेतीला पाणी मिळत नसल्याचे हे त्यांनी म्हटले आहे. शासनस्तरावरुन उपयायोजना करण्यात येईल.सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
तानाजी शेजाळ, तहसिलदार,पेण
भूजल सर्वेक्षण यंत्रणेस कळवणार गावांतील विहिरी व बोअरवेल्सचे पाणी आटल्याच्या समस्ये बाबत सिडकोच्या संबंधीत यंत्रणेस कळवण्यात आले आहे. त्यांच बरोबर भूजल सर्वेक्षण यंत्रणेस देखील कळवून अहवाल घेण्यात येईल. त्यांतून नेमके कारण स्पष्ट होवू शकेल.
प्रविण पवार, उप विभागीय महसुल अधिकारी,पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT