

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील सर्व वातानुकूलित बसेसच्या ठेकादाराचा ठेका संपल्याने शुक्रवारी सायंकाळपासून बससेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाची, प्रवाशांची नेहमीच गर्दीने फुलणारी आणि सर्वात फायद्याची अशी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौक ते एमआयडीसीच्या निवासी विभागातील वातानुकूल बस सेवा ऐन उन्हाळ्यात बंद पडल्याने प्रवासी घामाघूम झाले आहेत.
या संदर्भात निवासी विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले, मुख्य कारण असे समजले आहे की एसी बस चालविण्याचा ठेकेदाराचा ठेका अर्थात कंत्राट मुदत आठ महिन्यांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे ठेकेदाराने एसी बसगाड्या सर्वच ठिकाणाच्या मार्गांवर चालवीण्याच्या बंद केल्या आहेत.
सदर ठेकेदार एकूण आठ एसी बसगाड्या चालवत होता. परंतु आता त्या न चालविल्यामुळे अशाच धुळखात पडणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिककेत प्रशासक राजवट संपून लोकनियुक्त प्रतिनिधी राजवट सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी आता अशा कंत्राटी पद्धतीवर लवकर निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी भागातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान ठेकेदाराचे कंत्राट संपल्याने तेथेही सुरक्षारक्षक नसतो. एक स्थानिक ज्येष्ठ नागरिक फक्त ते सकाळी उघडून बंद करत आहे. सायंकाळी हे उद्यान कुलूपबंद असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व बाळगोपाळ मंडळींना ऐन सुट्टीत उपयोग करता येत नाही. त्यामुळे ठेकेदार पद्धतीचा निर्णय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित घ्यावा, अशीही अपेक्षा राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.
किमान आहे त्यातरी सुरू ठेवा
डोंबिवली पूर्वेकडील बाजी प्रभू चौक ते निवासी विभाग दरम्यान केडीएमटीची बस 51 क्रमांकाची सेवा 32 थांब्यांसह उपलब्ध आहे, ज्याचा प्रवास कालावधी अंदाजे 35 मिनिटे आहे. या मार्गावर एसी बसेस (मार्ग 55) देखील सुरू करण्यात आल्या होत्या. आता या बसेस ऐन उन्हाळ्यात बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना साध्या बसमधून प्रवास करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत कल्याण-डोंबिवलीतील सर्व मार्गांवर वातानुकूलित बसेस चालविण्याची प्रवाशांकडून मागणी वाढली आहे. मात्र आहे त्या तरी किमान एसी बसगाड्या सुरू ठेवण्यात याव्यात, अशीही अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.